
सामना प्रतिनिधी । मुंबई
9 फेब्रुवारीला होणाऱया राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाच्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षकांना ‘विशेष रजा’ मंजूर केली आहे. शनिवार 9 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 1.30 या वेळेत हे अधिवेशन परळ येथील दामोदर हॉलमध्ये होणार असून या अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांनाही एक दिवसाची सक्तीची ‘विशेष रजा’ मिळणार आहे.
मागील 40 वर्षांपासून फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱया शनिवारी हे अधिवेशन परळमध्ये आयोजित केले जाते. दरवर्षी मुंबई विभागातील एक ते दीड हजार शिक्षक या अधिवेशनाला उपस्थित राहतात, असा दावा शिक्षक परिषदेने केला आहे. अधिवेशनाच्या निमंत्रण पत्रिकेत शिक्षक परिषदेने या अधिवेशनाला मुख्याध्यापक व शिक्षकांना उपस्थित राहता यावे, यासाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन केल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चा रंगली आहे.
आधीच मराठा आरक्षण आंदोलन आणि पावसामुळे शाळांच्या रजेत भर पडली आहे. त्यातच ऐन परीक्षांच्या काळात शिक्षकांच्या अधिवेशनामुळे शाळांना सुट्टी दिल्यास विद्यार्थ्यांचा आणखी एक दिवस वाया जाणार आहे. या शिक्षक अधिवेशनासाठी शाळांना सुट्टी देण्याचे शासन परिपत्रकच मुंबईचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी काढले आहे.
अधिवेशनाप्रसंगी विविध कार्यक्रम
अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ते ‘मराठी शाळा… माझी जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान देतील. तसेच खास शिक्षकांसाठी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम विसुभाऊ बापट सादर करतील. याप्रसंगी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, भगवान साळुंखे अनुदानित शिक्षण वाचवा या विषयावर तसेच अतिरिक्त शिक्षक आणि समस्या या विषयावर नागोजी गाणार आपले विचार मांडतील.
शाळा बुडण्याचा प्रश्नच नाही
शाळेच्या वार्षिक 76 सुट्टय़ांच्या नियोजनात शिक्षक अधिवेशनाच्या सुट्टीचाही समावेश आहे. या 76 पैकी दोन सुट्टय़ा या मुख्याध्यापकांकडे राखीव ठेवले असतात. यातील एक सुट्टी ही खास अधिवेशनासाठीच असते. शिवाय शनिवार असल्याने मुंबईतील 80 टक्के शाळांना सुट्टीच आहे. 20 टक्के शाळांच्या सुट्टीचा प्रश्न आहे. ही सुट्टी मुख्याध्यापक राखीव सुट्टय़ांमधून घेणार आहेत. त्यामुळे शाळा बुडण्याचा प्रश्नच नाही.
– शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद



























































