
क्रिप्टो करन्सी अर्थात आभासी चलनाबद्दल जगभरात अनेक मतमतांतरे आहेत. काही देशांत या चलनावर बंदी घालण्यात आली आहे, तर काही देशांत या चलनाद्वारे केले जाणारे व्यवहार कायदेशीर मानले जात आहेत. हे चलन धोकादायक आहे की नाही हा मुद्दा लक्षात घेतला तरी या चलनाला वाढत चाललेला पाठिंबा नजरेआड करण्याजोगा नाही.
ब्लॉकचेनसारख्या अजोड सुरक्षा प्रणालीची जोड मिळाल्याने तर आता आयटीसारख्या क्षेत्रातल्याही अनेक कंपन्या क्रिप्टो करन्सीकडे आकर्षित झाल्या आहेत. बिटकॉईन्ससारखी अनेक आभासी चलने अस्तित्वात येत आहेत. या सगळ्याचा फायदा उठवण्यास अनेक आयटी कंपन्या उत्सुक आहेत. फेसबुकदेखील आता या स्पर्धेत उतरत असून लवकरच फेसबुकची स्वतःची क्रिप्टो करन्सी बाजारात दाखल होत आहे. फेसबुकने यासंदर्भात अधिकृत अशी काही घोषणा केली नसली तरी फेसबुकने युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडनच्या काही रिसर्चर्सनी स्थापलेल्या एका छोट्या स्टार्टअप कंपनीची यासाठी नेमणूक केल्याची आतल्या गोटातील बातमी आहे.
फेसबुक सर्वात आधी हे चलन व्हॉट्स ऍपसारख्या मातब्बर प्लॅटफॉर्मद्वारे युजर्सला उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहे. या आभासी चलनाद्वारे व्हॉट्स ऍपचे युजर्स एकमेकांशी सहजतेने आर्थिक व्यवहार करू शकणार आहेत. हिंदुस्थानात याआधीच आर्थिक व्यवहारासाठी एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म देण्याची घोषणा व्हॉट्स ऍपने केलेली आहे. त्याच्या जोडीलाच आता हा क्रिप्टो करन्सीचा डिजिटल प्लॅटफॉर्मदेखील वापरायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थात हिंदुस्थानात क्रिप्टो करन्सीवर बंदी असल्याने पुढे काय होणार हे बघणे औत्सुक्याचा विषय आहे. जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपली क्रिप्टो करन्सी बाजारात दाखल करत आहे ही बातमी क्रिप्टो युजर्स आणि क्रिप्टो करन्सी बाजारासाठीदेखील महत्त्वाची असून सगळेच त्याकडे डोळे लावून बसले आहेत. माहितीची चोरी आणि युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांची वैयक्तिक माहिती इतर कंपन्यांना शेअर केल्याच्या प्रकरणात फेसबुक आधीच जगभरातील विविध देशांत चौकशी आणि दंड बसणे या शिक्षांमधून पिचले जात आहे. त्यामुळे आता या क्रिप्टो करन्सीच्या कामात त्यांना फारच काळजीपूर्वक काम करावे लागत आहे.




























































