
कसदार आणि दर्जेदार साहित्याचे प्रकाशक अशी ओळख मौज प्रकाशन आहे. त्या त्या काळात लाभलेल्या संपादक आणि प्रकाशकांनी त्यात भर घालत या संस्थेचा नावलौकिक सर्वदूर पोहचवला आहे. संजय भागवत हे त्यातीलच एक महत्त्वाचे नाव. त्यांच्या निधनाने दर्जेदार प्रकाशक आपल्यातून निघून गेला आहे. मौज प्रकाशनचे माजी संपादक, प्रकाशक श्री. पु. भागवत यांच्या सेवानिवृत्तीनंतर मौज प्रकाशनगृहाची धुरा 1997 साली त्याकडे आली. तेव्हापासून 2015 पर्यंत ही धुरा संजय सांभाळत होते.
राम पटवर्धन श्री. पु. भागवत, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर यांच्यासारखे संपादक मौज प्रकाशनास लाभले. कथा, कविता, कादंबर्या, वैचारिक, संगीत, राजकीय, सामाजिक विषयाचे साहित्य मौज प्रकाशनने प्रकाशित केले. प्रतिवर्षी प्रसिद्ध होणारा दिवाळी अंक ही गुणवत्तेची परंपरा जपणाराच होता. संजय भागवत यांनी यापेक्षा वेगळ्या साहित्यास, वेगळ्या लेखकास व्यासपीठ दिले. संजय यांच्या कारकीर्दीत प्रामुख्याने मीना प्रभू, निळू दामले, लता काटदरे, मिलिंद बोकील या लेखकांना मौज प्रकाशनातून पुढे आणले. त्यांनीही पूर्वापार चालत आलेली दर्जा नि परंपरा कसोशीने जपली.
सकस वाङ्मय निर्मितीचे त्यांनी क्रतच घेतले होते. संगीताची आवड असलेले भागवत पेशाने सीए होते. त्यांचे वडील विष्णुपंत भागवत मुद्रण व्यवसायात होते तर काका म्हणजेच श्री. पु. भागवत संपादन प्रकाशनात कार्यरत होते. काका आणि वडिलांचे संस्कार यातून संजय भागवत यांची साहित्याकडे बघण्याची स्वतंत्र अशी दृष्टी निर्माण झाली होती. त्याचबरोबर प्रकाशन क्षेत्राविषयी साहित्य क्षेत्रातील लेखकांविषयी त्यांची काही निरीक्षणे होती, ती मार्मिक असत. संजय भागवत यांना श्री. पु. भागवतांच्या नावे दिला जाणारा राज्य सरकारचा उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार लाभला होता. संजय भागवत हे मितभाषी आणि विनोदी स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने प्रकाशन क्षेत्रातील सव्यासाची प्रकाशक हरपला आहे.






























































