ठसा : स्वराली जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलर्स वाहिनीवर ‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड निर्माण केले. यात मराठवाड्यातील माहूरगडची 13 वर्षीय गायिका स्वराली जाधव महाविजेती ठरली. त्याचबरोबर एक लाख रुपये रकमेच्या पुरस्कारासह मानाची सुवर्ण कट्यारही तिने पटकावली.

स्वराली ही मराठवाड्यातील माहूरगडची आहे. तिच्या गायन तपश्चर्येस जगदंबा मातेचा आशीर्वाद लाभला आहे. शास्त्रीय गायनासोबत स्वराली सूफी, गझल, ठुमरी, लावणी, लोकसंगीत, भक्तिसंगीत, कव्वाली यांसारख्या गायन प्रकारांचा रियाज अतिशय ताकदीने करीत असते. आशा भोसले यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जुलै 2018 मध्ये ‘सूर नवा ध्यास नवा’ हा रियॅलिटी शो सुरू झाला. सहा हजार गायकांतून 70 जणांची, नंतर त्यातून 21 जणांची निवड, त्यातूनही 15 जणांची निवड एवढय़ा चाळणीतून अंतिम स्पर्धेसाठी सहा स्पर्धकांची निवड झाली. वय वर्षे 6 ते 15 या वयोगटातील छोट्या सूरवीरांनी महाराष्ट्राचे कान तृप्त केले. या संपूर्ण सिझनमध्ये स्वरालीने भिन्न आवाजांच्या जातकुळींची, गायनशैलीची, मातब्बर गायकांनी गायलेली गाणी सादर केली.

स्वरालीची गायनशैली स्वतंत्र होती. ज्याची परीक्षक अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे, महेश काळे यांनी प्रशंसा केली. स्वरालीने या शोमध्ये सुलोचना चव्हाण, शोभा गुर्टू, नुसरत फतेह अली खान, रिचा शर्मा, रेश्मा सोनवणे, सुखविंदर सिंग, शाहीर साबळे, उर्मिला धनगर, रेखा भारद्वाज, नंदिनी श्रीकर या गायकांची अवघड गाणी सादर केली. बॉटमलाइनमध्ये न येता स्वराली मेरीट आणि जिनीअस हे गुण प्राप्त करीत राहिली. एकापेक्षा एक बेस्ट परफॉर्मन्स देत दोनदा सुवर्ण कट्यारीचा सन्मान तिला प्राप्त झाला. 13 वर्षांच्या स्वरालीने वयाच्या चौथ्या वर्षापासून आपले वडील राजू जाधव स्वरस्वतीराज यांच्याकडे संगीताचे प्राथमिक धडे घेतले. गुरुकुल पद्धतीने तिची संगीत साधना सुरू आहे आणि या यशाने तिच्या संगीतातील करीअरला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.