
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
गेल्यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन झाल्यानंतर यावेळी महिलां संघांचा आयपीएलमधील सहभाग थोडा व्यापक करण्यात येणार आहे. यावेळी तीन संघांना परवानगी देण्यात येणार असून त्यांच्यात 7 ते 10 दिवस आयपीएल लढती होतील. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीने असा विचार सुरू असल्याचे म्हटले आहे.
महिलांची आयपीएल सुरू होण्यात मात्र अद्याप बरेच अडथळे असल्यामुळे तूर्तास तीन संघांत हा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी आयपीएल ट्रेलब्लेझर्स व सुपरनोव्हास या संघांत सामना झाला होता. मिताली राज आणि हरमनप्रीत यांनी या संघांचे नेतृत्व केले होते.
सध्या तीन संघांतच महिलांचे सामने होणार आहेत, अधिक संघांचा विचार तूर्तास करता येणार नाही. हे तीन संघ एकमेकांशी लढती खेळतील आणि त्यातील दोन अव्वल संघ अंतिम लढतीत आमनेसामने येतील.पुरुषांच्या आयपीएलदरम्यानच हे सामने असतील, असे प्रशासकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




























































