गो बॅक मोदी! आसामपाठोपाठ आंध्रातही विरोधाचे नारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-tension

सामना ऑनलाईन । हैदराबाद

आसामात सलग दोन दिवस काळ्या झेंड्यांना जागोजागी सामोरे जावे लागलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंध्र प्रदेशच्या दौऱयात आज ‘तेलगू देसम’ने ‘मोदी गो बॅक’चा नारा बुलंद केला. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आंध्रवर मोदी सरकारने केलेल्या घोर अन्यायाविरोधात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमने आंदोलन केले.

तेलगू देसम हा पक्ष भाजपप्रणीत एनडीएतून बाहेर पडल्यानंतर एक वर्षाने पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच आंध्रच्या दौऱयावर आले होते. त्यानिमित्त तेलगू देसमने राज्यभरात आंदोलन केले. विजवाडा, गुंटूर येथे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे शर्ट टी-शर्ट घालून ‘मोदी, गो बॅक’च्या घोषणा देत मोर्चे काढले.

स्वागताला मंत्री नाही
पंतप्रधान एखाद्या राज्यात गेल्यास तिथे सरकार कोणाचेही असले तरी राजशिष्टाचाराचा भाग म्हणून एखादा मंत्री विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जात असतो; पण मोदी यांच्या आंध्रच्या दौऱयावेळी राज्य सरकारमधील कुणीही मंत्री त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित नव्हता. गन्नावरम विमानतळावर दाखल झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून स्वागत स्वीकारून मोदी हे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने गुंटूरकडे रवाना झाले.

काँग्रेस, कम्युनिस्टांचेही आंदोलन
तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती करण्यासाठी विभाजन केलेल्या आंध्र प्रदेशला दिलेली आश्वासने मोदी सरकारने पाळली नाहीत. त्याविरोधात काँग्रेसने आज ‘काळा दिवस’ पाळून निषेध केला, तर सीपीआय आणि सीपीआय (एम) या दोन्ही डाव्या पक्षांनीही पंतप्रधान मोदी यांच्या आंध्रच्या दौऱयावेळी आंदोलन केले. कडप्पा आणि कुखुल या जिह्यांतही निषेध आंदोलन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोदाती द्रोही म्हणजे महाविश्वासघातकी आहेत. ते आता आंध्रवर चढाई करण्यासाठी राज्यातील जनतेची चेष्टा करण्यासाठी आले आहेत. त्यांच्या सरकारने आमच्या राज्यावर घोर अन्याय केलाय. त्यांनी देशाच्या व्यवस्थेचा विध्वंस करून राष्ट्राची हानी केली आहे. त्यामुळे देशात ते जातील तेथे त्यांना आंदोलनाला तोंड द्यावे लागत आहे.
– चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश