लेख – दासबोध : जीवनाच्या सर्व पैलूंचे निरीक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नामदेव सदावर्ते<<

समाजकारण, राजकारण, व्यवस्थापन शास्त्र्ा, अर्थकारण, आरोग्य, विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्मकारण या सर्व क्षेत्राविषयी स्पष्टपणे मार्गदर्शन समर्थांच्या दासबोध या ग्रंथात आहे. समर्थांनी समाजाचे अतिसूक्ष्म निरीक्षण केले आहे. या ग्रंथातील विषयांची विविधता पाहता समर्थांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांचे स्पष्टीकरण या ग्रंथात केले आहे. या ग्रंथाचा मुख्य विषय भगवद्भक्ती हाच आहे. पण शुद्ध भक्ती घडण्यासाठी मनाची शुद्धता घडविणारे मार्गदर्शक विवेचन या ग्रंथात आहे.

संत ज्ञानराजांची ज्ञानेश्वरी, संत एकनाथांचे भागवत व समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हे तीन ग्रंथ मराठी भाषेतील अलौकिक रत्ने आहेत. ज्ञानेश्वरी हा मराठी मायबोलीच्या कपाळावरील सौभाग्य मळवट असून ती नाथांचे भागवत ही पैठणी नेसलेली आहे. तर समर्थांचा दासबोध हा तिच्या गळ्यातील अनमोल चंद्रहार आहे. कवी सोपानदेव म्हणतात-

माझी मायबोली आज आली माहेराला ।

सभोवती संत योगी सुपुत्रांचा मेळा ।।

नेसलीसे भागवत नाथांचे पैठणी ।

माथा शोभे मुकुट गाथा तुकयाचा नामी ।

ज्ञानेशांची ज्ञानेश्वरी मळवट भाळा ।।

मुक्ता जनीचे अभंग कर्णफूले कानी ।

अंगुठीत फाके प्रभा चोख्याची खुलुनी ।

समर्थाचा दासबोध चंद्रहार गळा ।।

श्री दासबोध हा केवळ अध्यात्माचे विवेचन करणारा ग्रंथ नसून व्यक्तिमत्त्व विकास घडविणारा मार्गदर्शक ग्रंथ आहे. हा ग्रंथ तरुणांना दिशादर्शक असून त्यांचा सर्वांगीण विकास घडवू शकणारा अजोड ग्रंथ आहे. समाजकारण, राजकारण, व्यवस्थापन शास्त्र्ा, अर्थकारण, आरोग्य, विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्मकारण या सर्व क्षेत्राविषयी स्पष्टपणे मार्गदर्शन या ग्रंथात आहे. समर्थांनी समाजाचे अतिसुक्ष्म निरीक्षण केले असल्याने जनसामान्यातील दोष घालविण्यासाठी अचूक उपाय त्यांनी दासबोधात सांगितले. श्री दासबोध हा ग्रंथ ओवीबद्ध असून गेय छंदात आहे. यात समर्थांनी विविध विषयांवर ओवीबद्ध निबंध रचलेले आहेत. समर्थांची भाषा ओघवती असून साहित्यातील सर्वालंकारयुक्त आहे. अद्वैत तत्त्वज्ञान व भक्तिमार्गाच्या नामस्मरणादि उपासनापद्धतीसह अनेकविध विषयांचा समावेश दासबोधात आहे. व्यवहाराच्या पहिल्या पायरीपासून परमार्थांच्या शेवटच्या पायरीपर्यंत समर्थांनी या ग्रंथात जिवाला उपदेश केला आहे.

या ग्रंथातील विषयांची विविधता पाहता समर्थांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांचे स्पष्टीकरण या ग्रंथात केले आहे. धार्मिक अध्यात्मिक विषयात माया, ब्रह्म, वैराग्य यांचे विवेचन करणाऱ्या समर्थांनी व्यक्तिविकासासाठी आवश्यक विविध विषयांचे स्पष्टीकरण दासबोधात केले आहे. गुरू-शिष्य लक्षण, मूर्ख, पढतमूर्ख लक्षणे, विरक्त लक्षण, साधक लक्षण, उत्तम पुरुष लक्षण, विवेक लक्षण आदी विषयावर समर्थांनी मार्गदर्शन केले आहे.

या ग्रंथाचा मुख्य विषय भगवद्भक्ती हाच आहे. पण शुद्ध भक्ती घडण्यासाठी मनाची शुद्धता घडविणारे मार्गदर्शक विवेचन या ग्रंथात आहे. उत्कट भक्तीने परमार्थ कसा करावा हे सांगण्यासाठी हा ग्रंथ आहे. या ग्रंथात ‘प्रपंच करावा नेटका’ असे सांगणाऱ्या समर्थांनी भक्तिमार्ग सोपा करून सांगितला आहे. प्रपंच व परमार्थासाठी सतत प्रयत्न करीत राहा, असे सांगणारे समर्थ दैववादी नसून प्रयत्नमार्गी होते. सर्व कार्यात ‘प्रयत्न हाच परमेश्वर’ हे सूत्र समर्थ सांगतात. प्रयत्न, प्रचीती व प्रबोध ही दासबोधाची सूत्रे आहेत. विवेक व वैराग्ययुक्त भक्तीसाठी शुद्ध आत्मज्ञानाची गरज दासबोधात प्रकट केली आहे.

महंतलक्षण, राजकारणात निस्पृहता, कथा कीर्तन, उपासना, आत्मराम, जनस्वभाव, लेखन कला आदी विषयांवर समर्थांनी या ग्रंथात मार्गदर्शन केले आहे. दासबोधात वीस दशकात दोनशे समास असून प्रत्येक दशकात दहा समास आहेत. प्रत्येक समासात एका विषयावर ओवीबद्ध विवेचन आहे.

धर्म संस्कृतीवर आघात करणाऱ्या अस्मानी-सुलतानी आपत्तीच्या प्रसंगी वैयक्तिक व सामूहिक पातळीवर प्रतिकारक्षमता असलेला भक्कम समाज उभा करण्यासाठी समर्थांनी आयुष्यभर प्रयत्न केले. ज्ञानेश्वर माऊली प्रतिभासंपन्न होते. संत नामदेवांनी महाराष्ट्राबाहेर प्रचार केला. समर्थांनी या संतांच्या मराठी बाण्यात प्रतिकारक्षमता निर्माण केली. भक्तिमार्गी संतांच्या उपदेशाने समाज सोशिक व सहिष्णू बनला होता. ‘जयजय रघुवीर समर्थ’ हा मंत्र महाराष्ट्रात सर्वत्र घुमविणाऱ्या समर्थांनी समाज समर्थ बनविला.  कुटुंबात मुलेबाळे जास्त झाली तर घरात साठवून ठेवलेला पैसा संपून जातो. त्यामुळे त्यांना पोटभर खायला मिळत नाही व त्या मुलांवर भीक मागण्याची वेळ येते. समर्थांनी दैन्य, दुःख व गरिबीचे योग्य कारण सांगून समाज समर्थ, संपन्न, सुखी होण्यासाठी सावध केले आहे. समर्थ म्हणतात-

लेकुरें उदंड जाली ।

तों ते लक्ष्मी निघोन गेली ।

बापडी भिकेसी लागली ।

काही खाया मिळेना ।।

श्रीदासबोधातील प्रत्येक समासात स्वतंत्र विषयावर अत्यंत सोप्या भाषेत सूक्ष्म निरूपण करीत समर्थ विवेक सांगतात. पहिल्या दशकात ग्रंथारंभलक्षण सांगून गणेश, शारदा, सद्गुरू, संत, श्रोतेजनांना वंदन-स्तवन केले आहे. दुसऱ्या समासातील विषय गमतीदार असून, डोळ्यात अंजन घालणारे आहेत. मुर्खलक्षण, उत्तमगुण दर्शन, कुविद्या लक्षण या समासातून मूर्खपणाची शेकडो लक्षणे अत्यंत विनोदी रचनेतून सांगतात. समर्थ म्हणतात, वाईट मार्गाने धन मिळवू नये. धर्म, न्याय व नीतीने वागावे. जवळचे मित्र तोडू नये.

अनीतिने द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी ।

संगतीचे मनुष्य तोडी । तो एक मूर्ख ।।

मूर्खांची लक्षणे अपार आहेत पण त्यातील काही त्यांचा त्याग घडावा म्हणून यथामती मी वर्णन केली आहेत. शेवटी समर्थ म्हणतात –

उत्तम लक्षणे घ्यावी । मूर्ख लक्षणे त्यागावी ।

पुढिले समासी आघवी । निरोपिली ।।

व्यक्तीचे वैयक्तिक व सामाजिक आचरण शुद्ध असावे, निःस्पृह असावे असा समर्थांचा आग्रह आहे. दासबोधाच्या केवळ वाचनाने आपले अज्ञान व दुर्गुण समजतात. तसेच आपण आचरणात सुधारणा कशी करावी हेही समर्थ दासबोधात सांगतात.

नवविधा भक्तीच्या नऊ प्रकाराचे सविस्तर वर्णन समर्थांनी दासबोधात केले आहे. दासबोध हा ज्ञानाचा सागर असून संसारी जिवाला आपले जीवन सुखी, समृद्ध, आरोग्यपूर्ण व आदर्श करण्याचे मार्गदर्शन करणारा आहे. समर्थांची भाषा सकलजनास समजेल अशी सोपी व आनंददायी आहे.