मोदी सरकारचे दिवस भरले आहेत – ममता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिवस संपले आहेत. त्यांचे दिवस आता भरले आहेत. ते आता आम्हाला घाबरवू शकत नाहीत असा कडक इशारा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला. मोदी यांनी मला अटक करूनच दाखवावी असे आव्हानही ममतांनी यावेळी दिले.

आपतर्फे आज येथील जंतरमंतरवर विरोधी पक्षांची महारॅली आयोजित केली होती तेव्हा त्या बोलत होत्या. ‘जो डरते है वो मरता है, जो लढते है वह जितते है’ असे मोदी यांना सुनावत ममता पुढे म्हणाल्या, मोदीजी आम्हाला फार काळ घाबरवू शकत नाहीत. मोदी काय करतील? ते मला तुरुंगात पाठवतील, तपास एजन्सी माझ्या मागे लावतील, आमची हत्या करतील? पण लक्षात ठेवा, आम्ही घाबरणारे नाहीत अशा शब्दांत ममतांनी मोदी यांना सुनावले.

या रॅलीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे प्रमुख, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाकपचे नेते सीताराम येचुरी, आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते आनंद शर्मा आदी विरोधी पक्षाचे नेते हजर होते.