देवनारचे पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहाथ सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

तृतीयपंथीयाकडून लाच घेताना गोवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ट्रॅप झाल्याची घटना ताजी असतानाच आता देवनारचे पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहाथ सापडले. दत्तात्रय चौधरी (50) असे त्यांचे नाव असून त्यांना 80 हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता घेताना ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने पकडले.

अजय (नाव बदललेले) त्याचा भाऊ व मित्राविरोधात देवनार पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्या गुह्याचा तपास दत्तात्रय चौधरी यांच्याकडे आहे. अजयसह सर्व आरोपींना अंतरिम जामीन मंजूर झाला असून जामीनाची अंतिम सुनावणी बाकी आहे. आरोपींना जामीन मिळवून देण्याबरोबर गुह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी चौधरी यांनी अजयकडे तीन लाखांची मागणी केली होती.