
‘अजून हाती काठी आलेली नाही…’ पूर्वीच्या आजी–आजोबांचे उगीचच आवडीचे वाक्य. काठी म्हणजे परावलंबित्व. म्हातारपण… अशी विशेषणं तिच्यावर उगीचच लादली गेलेली. आज मात्र हीच काठी रुबाबदार, स्टायलीश आणि फॅशनेबल झाली आहे. ती चालताना आधार तर देतेच, पण आजोबांचा रुबाबही वाढवते.
नक्षीदार मुठीची, सुबक बाकदार आकाराची, रुबाबदार काठी सध्या आजी आजोबांची स्टाईल स्टेटमेण्ट आहे. सतत सावलीसारखी सोबत असलेली काठी त्यांच्यासाठी हक्काचा आधार आहे. सध्या अनेक आजी-आजोबांच्या हातात या स्टायलीश काठ्या आल्या असून त्यामुळे त्यांचा रूबाब उठून दिसतोय. या हक्काच्या काठीसोबत ते बिनधास्त वावरत असतात.
सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या स्टायलीश आणि आकर्षक काठ्या उपलब्ध आहेत. अलीकडे तर स्टायलीश काठी घेऊन चालणे हीदेखील फॅशन ठरली आहे. यातील काही काठ्या आकर्षक मुठीच्या आणि चांगल्या दर्जाच्या लाकडाच्याही मिळतात. आधुनिक काळानुसार या काठ्या वेगवेगळ्या डिझाईनच्या मिळू लागल्या आहेत. यातील काही काठ्या तर लक्झरीसुद्धा आहेत. यात ओक झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या क्लासिक अमेरिकन काठ्याही मिळतात.
थोडे हटके
एखाद्या पार्टीला, समारंभाला जात असाल, सोहळ्यात इतरांहून थोडं हटके दिसावंसं वाटत असेल तर तुमच्या पेहरावात ही काठी नक्कीच मदत करते. या काठीमुळे तुम्ही आकर्षक तर दिसालच, पण तुमचे व्यक्तिमत्त्व बहरेल. या काठीमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आत्मविश्वासाची एक छानसी झालर येईल यात शंका नाही. लग्नसमारंभाला जाताना हातात काठी धरून चाल म्हणजे आपण वयस्कर झालो असं पाहणाऱयांना वाटेल असं मनात आणायचंच नाही. कारण ते दिवस आता गेले. रूबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी आणि ताठ कण्यासाठी ही काठी वापरता येते. काठीमुळे चालण्यातही दमदारपणा नक्कीच येईल.
रस्ता ओलांडण्यासाठी…
निवृत्तीनंतर शरीराची हालचाल पटापट होत नाही हे खरं, बरेचदा रस्ता ओलांडताना म्हणूनच ज्येष्ठ नागरिक बाचकतात. त्यांच्या मनात उगीचच संभ्रम असतो. त्यामुळे रस्ता ओलांडायची वेळ येते तेव्हा ज्येष्ठ नागरिक तरुणांचा आधार मागतात. गाडी थांबेल की नाही, पटकन गाडी आली तर हात गाडीला दिसला नाही तर… असे विचारही त्यांच्या मनाला भेडसावत असतात. पण जर याच ज्येष्ठांच्या हातात काठी असेल तर ही काठी उंचावून ते रस्त्यावर गाड्या थांबवू शकतात. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी या काठीचा मोठा फायदा होतो.
संरक्षणासाठी…
ज्येष्ठ नागरिकांना हाताशी काठी लागते ती आधार म्हणून… पण ही काठी आजी-आजोबांसाठी केवळ त्यांचा आधारच नसतो, तर ती त्यांचं संरक्षण करते. सांभाळही करते. ही काठी ते आपल्या संरक्षणासाठीही करू शकतात. कुणी धक्का दिला, अरेरावी करू लागले किंवा हातातले सामान हिसकावण्याचा कुणी प्रयत्न केला तर आपल्याजवळील या काठीने ते त्यांना चांगला चोप देता येऊ शकतात. वृद्ध, वयस्कर समजून जर कुणी दमदाटी करत असेल तर त्याला इंगा दाखवण्यासाठी आजी-आजोबांना आपल्याजवळची ही काठी फायद्याचीच ठरते.
काठ्या कुठे मिळतात…
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या काठ्या आज ऑनलाइनही मिळू शकतात. अनेक प्रकारच्या ऍप्सद्वारे या काठ्यांची विक्री होत असते. तेथूनही या काठ्यांची खरेदी करू शकाल. साधारणपणे लाकडाचे सामान, वस्तू ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी या काठ्या मिळू शकतात. अनेक डिझाईनसह या काठ्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ही काठी खरेदी करताना त्यांचा दर्जा, चांगले लाकूड हे नीट तपासून घेतल्या, तर पुढची अनेक वर्षे त्या काठीचा वापर करता येईल. शक्यतो मजबुती पाहूनच काठ्या खरेदी करा.



























































