पुद्दुचेरीत हेल्मेटसक्तीवरून राडेबाजी, मुख्यमंत्री नारायणसामी रस्त्यावरच झोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुद्दुचेरी

पुद्दुचेरीत हेल्मेटसक्तीवरून जबरदस्त राडेबाजी झाली. उपराज्यपाल किरण बेदी यांनी केलेल्या हेल्मेटसक्तीच्या विरोधात मुख्यमंत्री नारायणसामी चक्क रस्त्यावरच झोपले. या आंदोलनाची छायाचित्रेही त्यांनी ट्विट केली आहेत. नारायणसामी यांच्याबरोबर काँग्रेस व डीएमकेचे आमदारही हेल्मेटसक्तीच्या विरोधात रस्त्यावर झोपले.

पुद्दुचेरीत उपराज्यपाल किरण बेदी यांनी दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्ती केली आहे. राज्यभर या निर्णयावरून संतापाचे वातावरण आहे. हेल्मेटसक्ती टप्प्याटप्प्याने लागू करण्यात यावी, अशी मागणी करत मुख्यमंत्री नारायणसामी यांनी या निर्णयाला विरोध केला. हेल्मेटसक्तीच्या विरोधात आज राजभवनासमोर आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी आपल्या फौजफाटय़ासह या आंदोलनात सहभागी झाले. हेल्मेटसक्तीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांसह आमदारही रस्त्यावर झोपले. या वेळी पत्रकारांशी बोलताना नारायणसामी यांनी उपराज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या फायलींचा ढिगारा साचला आहे. मात्र उपराज्यपाल मोफत तांदूळ वाटपातच मग्न आहेत. उपराज्यपालांच्या उदासीन धोरणामुळे पुद्दुचेरीचा विकास खोळंबला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

उपराज्यपाल किरण बेदी यांनी कोणताही सारासार विचार न करता हेल्मेटसक्ती लागू केली आहे. हेल्मेटसक्ती लागू करण्यापूर्वी जनतेत जागरूकता निर्माण करणे गरजेचे होते. परंतु बेदी यांनी घाईघाईत हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.