
सामना प्रतिनिधी, उटी बुद्रुक
औसा तालुक्यातील लखणगाव येथील सात एकर ऊस शॉर्ट सर्किटने जळून खाक झाला आहे. १४ रोजी सायंकाळी पाच वाजता शॉर्ट सर्किट होऊन उसाने पेट घेतला. यात मोहन खोजे, रावण खोजे, कल्याण खोजे, महादेव खोजे या चार शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामुळे ऐन दुष्काळ परिस्थितीत मोठ्या प्रमाणात नुकसानीची झळ बसली आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. दरम्यान ऊस जळाल्याची माहिती मांजरा सहकारी साखर कारखान्याचे गट स्लिप बॉय व कारखान्याचे संचालक सदाशिव कदम यांना कळविली. याची दखल घेऊन तोड पाठवली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला वेळोवेळी धोकादायक डिपी हलवण्याची मागणी करूनही याची दखल घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसानाचा सामना करावा लागला, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.




























































