
सामना प्रतिनिधी । बीड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असणारा पक्ष आपल्याला उभा करायची आहे . त्यासाठी पदाधिकाऱ्यांचे काम प्रामाणिक असले पाहिजे. निवडणुका समोर आहेत. पक्षासाठी काम करा. एकमेकांच्या तक्रारी नको. कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात बीडचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कानउघडणी केली. नियुक्ती झाल्यानंतर बीडमध्ये ते दाखल झाले. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आजी माजी पदाधिकाऱ्यांची बीड मध्ये बैठक शुक्रवारी झाली. यावेळी दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या कामांचा आढावा घेऊन समाधान व्यक्त करत आनंद जाधव पुढे म्हणाले, आपण बीड जिल्ह्यात शिवसैनिकांची नव्याने मोट बांधणार आहोत. आठ दिवसाचा जिल्हा दौरा करणार आहोत. गावागावात जाऊन स्थापन केलेल्या शाखा आपण तपासणार आहोत. कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भविष्यात पदावर राहण्याचा अधिकार नसणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत. बीड मतदार संघावर आपण विशेष लक्ष देणार आहोत. शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आहे. शिवसैनिकांनी कामाला लागावे. यश खेचून आणायचे आहे. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. जुन्या पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळाला पाहिजे. जनतेच्या सुख दुःखात सहभागी व्हा. दुष्काळात सामन्यांना आधार द्या. कोणी अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरोधात पेटून उठा, असेही आनंद जाधव यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांनी यावेळी मत व्यक्त केले. यावेळी लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, सह संपर्कप्रमुख प्रा. सुनील धांडे, चंद्रकांत नवले, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, माजी मंत्री बदामराव पंडित, अनिल विचारे, सुनील विचारे यांच्या सह विद्यमान पदाधिकारी उपस्थित होते.
एकजूट हीच आपली ताकद – खासदार खैरे
आगामी निवडणुकात शिवसेनेला मैदान जिंकायचे आहे. समोर कोणी ही असो एकजूट आपली ताकद आहे. समोर भगवा ध्वज आणि धनुष्यबाण बघून कामाला लागायचं आहे. आता कामाला लागा आणि आपले कर्तृत्व सिद्ध करा, असे आवाहन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.






























































