
सूर्यकांत म्हात्रे, चिरनेर
उरण तालुक्यातील चिरनेर गव्हाण फाटा रोडवर असणाऱ्या दिघोडे गावाजवळ कस्टम बाँडेड असणाऱ्या “डब्लू” वेअरहाऊसला काल रात्री भीषण आग लागल्याने प्रचंड अग्नितांडव निर्माण झाले आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने शर्तीने प्रयत्न करूनही आग आटोक्यात न आल्याने या आगीत कोट्यवधींचा किमती माल जळून खाक झाला आहे.
दिघोडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये ‘डब्ल्यू’ नामक गोदाम हे कस्टमच्या परवानगीने बाँड मालाची साठवणूक करून तेथे मालाची हाताळणी केली जाते. मात्र या गोदामामध्ये परवानगी नसणारे कार्गो ठेवण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात एसीचा कार्गो, टायर तसेच अन्य ज्वलनशील केमिकलचे ड्रमही बेकायदेशीरपणे ठेवले असल्याचे दिसून येत आहे. रात्री नऊच्या सुमारास अज्ञात कारणाने ही आग या गोदामाला लागली. या लागलेल्या आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले. गोदामात असणारा एसी कार्गोसह इतर मालही जळून खाक झाला. तसेच या डब्ल्यू गोदामामध्ये आग विझविण्यासाठी कोणतीही अग्निशमन यंत्रणा नसल्याने सिडको, जेएनपीटी, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहा बंबानी या आगीवर नियंत्रण करण्यासाठी शिकस्त केली अग्निशमन कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आग नियंत्रणात आली नसल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पहाटे चार च्या सुमारास आग नियंत्रणात आली मात्र तोपर्यंत गोदामाची राख रांगोळी झाली होती.
अलीकडच्या काही महिन्यांपूर्वी वेश्वि येथील प्लॅटिनम, चिर्ले येथील वैष्णो आणि आता डब्लू अशा गोदमाना आग लागून कोट्यवधींचे नुकसान होऊनही गोदाम मालकांना इन्शुरन्स कंपनीकडून करोडो रुपयांची नुकसान भरपाई मिळत असल्याने गोदामांना मुद्दाम आग लावली तर जात नाही ना असा संशयाचा धूर निघत आहे.































































