पानमळ्यांना शेवटची घरघर; पानउत्पादक शेतकऱ्यांना विमा देण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जाफराबाद

जालना जिल्ह्यातील व जाफराबाद तालुक्यातील भारज गावातील पानतांड्यांना शेवटची घरघर लागली असून 200 पानतांडे असलेले गाव आता 50 पानमळ्यावर आले आहे. निसर्गाबरोबर सरकारचीसुध्दा पानतांड्यावर वक्रदृष्टी असून एकदाही पीकविमा दिला नसल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांनी विमा सरंक्षण मिळण्याची मागणी केली आहे. नागवेलीचे भारज म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या या गावात 2001 ते 2004 च्या दरम्यान 200 पानतांडे सांभाळणारे शेतकरी आता निसर्गाच्या तावडीत सापडल्याने अवघे 50 पान उत्पादक जिवाचे रान करुन पानमळे सांभाळत आहे.

अत्यंत कष्टाचे काम लहान मुलासारखे संगोपन करुनही हमी उत्पन्न होईल हे निश्चित नसतानाही पानमळे सांभाळावे लागतात. गेल्या 15 ते 20 वर्षांपुर्वी या पानमळ्यातील नागवेलीची पान संपुर्ण देशभरात प्रसिध्द होते. भारजची पान म्हटल्यावर भावसुध्दा जास्त मिळत होता. दरम्यान दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणामुळे पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे पानशेतीचे नुकसान होत असताना शासनाकडून कोठलीही आर्थिक मदत मिळत नाही. नागवेलीची शेती दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली असून औषधी, धार्मिक कार्यक्रमात आवश्यक लागणारे पानाचे संगोपन होण्यासाठी शासनाने विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी भारज येथील पान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.