
सामना प्रतिनिधी। पुणे
2019 हे वर्ष फक्त शिवसेना आणि भगव्या झेंडय़ाचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 150 ते 175 आमदार निवडून येणार असा ठाम विश्वास शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेसाठी राजकारणापेक्षा जनतेला दिलेली वचने पूर्ण करा ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे, म्हणून वचने पूर्ण करून वचनपूर्तीचे शिवधनुष्य पेलणे हे शिवसेनेचे मोठे कार्य असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जलसंपदा विभागाच्या वतीने पुण्याच्या दक्षिण उपनगरांमध्ये असलेल्या जांभुळवाडी तलावाचे सुशोभीकरण, साडेतीन किलोमीटरचा जॉगिंग ट्रक, अभ्यासिका, वाचनालय आदी सुमारे साडेतेरा कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱहे, शहर प्रमुख महादेव बाबर आदी शिवसेना पदाधिकारी आणि मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. सभेपूर्वी कश्मीरमधील पुलवामामधील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कोणतीही आतषबाजी, सत्कार-समारंभ न करता साधेपणाने हा समारंभ झाला. मी शेतकरी नाही, शहरी बाबू आहे, परंतु शेतकऱयांची दुःखं मला कळतात असे सांगून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या 12 फेब्रुवारीच्या सोलापूर दौऱयातील दाखला दिला. पोखरापूरच्या शेतकऱयांचा गेली 21 वर्षांचा पाणीप्रश्न रखडला होता. त्यांनी मला निवेदन दिले. मी राज्यमंत्री शिवतारे यांना ते निवेदन पाठवले. अवघ्या तीन-चार दिवसांत त्यांनी हा प्रश्न सोडवला. 5 मार्चपूर्वी या कामाची निविदा निघणार आहे. आमच्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या नसतात, तर मधल्या साडेचार वर्षांत जनतेला दिलेल्या वचनांच्या पूर्ततेचा शिवधनुष्य पेलणे हे खरे काम आहे. पुरंदरला 2014 च्या निवडणुकीत प्रचारासाठी मी आलो होतो तेव्हा शिवतारे आमदार होतील, त्यांना मोठी जबाबदारी मिळेल असे म्हणालो होतो. ते मंत्री झाले. जबाबदारी पेलणे ही सोपी गोष्ट नसते. ती पेलून वचनपूर्तीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.

































































