
सामना प्रतिनिधी, मुंबई
अतिजलद संपर्क, सुस्पष्ट आवाज, मेसेज आणि ‘जीपीएस’सारख्या अत्याधुनिक सुविधा असणारी डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली मुंबई अग्निशमन दलात येणार आहे. अग्निशमन केंद्र, अग्निशमन वाहने आणि नियंत्रण कक्षात ही यंत्रणा वापरली जाणार आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत वेगाने संपर्क साधणे शक्य होणार असल्याने बचावकार्यासाठी मोठी मदत होणार आहे.
काळबादेवी येथे मे 2015 मध्ये लागलेल्या भीषण आगीत रहिवाशांसह अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांचाही मृत्यू झाला होता. या आगीनंतर संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ‘सत्यशोधक समिती’ने बिनतारी संदेश वाहिनी यंत्रणा सक्षम करण्याची शिफारस करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन स्थितीत संपर्कासाठी पालिकेने अत्याधुनिक डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे. पेलोरस टेक्नॉलॉजी प्रा. लि.कडून ही सेवा घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
मेसेज, कॉल आणि वॉकीटॉकीचे जीपीएस लेकेशन
नवी प्रणाली हेडफोन लावून वापरता येणार असल्यामुळे बचावकार्यासाठी हात मोकळे राहतील. यावरून मेसेज, कॉल करता येणार असून वॉकीटॉकीचे जीपीएस लोकेशनही कळणार आहे. विशेष म्हणजे एक मीटर पाण्यात 30 मिनिटे राहू शकणार आहे. याची बॅटरी 14 ते 16 तास चालेल.
11 कोटींचा खर्च येणार
मोटोरोला बनावटीचे ‘एक्सआयआर पी 86681’चे मॉडेल. z प्रति 45,892.56 किमतीप्रमाणे 500 नगांची खरेदी. z या कामासाठी दोन वर्षांचा हमी कालावधी आणि पुढील तीन वर्षांच्या सर्वसमावेशक परिरक्षणासह कंत्राटाची एकूण रक्कम 11,80,43,371.
म्हणूनच घेतला निर्णय
अग्निशमन दलात सध्या व्ही.एच.एफ. प्रणालीवर आधारित ऍनेलॉग प्रकारची बिनतारी संदेश यंत्रणा वापरली जात आहे. यामध्ये वापरण्यात येणारे बिनतारी संच हे 20 वर्षे जुने झाल्यामुळे कालबाह्य झाले आहेत. यांचे सुटे भाग बाजारात सहजतेने उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांची दुरुस्ती व परिरक्षण वेळेत करता येत नाही. यामुळे अग्निशमन दलाच्या कामात अडथळे आणि मर्यादा येत असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.



























































