शहरे परवडत नाहीत म्हणून लोक गावाकडे चालले, IIT मुंबईतील तज्ञांचा अभ्यास अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

जागेची वाढती मागणी आणि महागाई यामुळे शहरांतील नागरिकांना आसपासच्या परवडणाऱ्या शहरवजा ग्रामीण भागांमध्ये स्थलांतरित व्हावे लागत आहे. परिणामी तेथील सुविधांवर ताण पडत आहे असे पवई येथील आयआयटी मुंबईने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. शहरांच्या आसपास असलेल्या या ग्रामीण भागांचे योग्य नियोजन न केल्यास समस्यांना आमंत्रण मिळेल असा इशाराही तज्ञांनी दिला आहे.

आयआयटी मुंबईतील सिव्हिल इंजिनीयरिंग विभागाचे प्रमुख प्रा. टी. आय. एल्डो आणि त्यांच्या टीमने शहरे आणि शहरांच्या आसपास असलेले ग्रामीण भाग यांचा अभ्यास केला. शहरांची वाढ अनियंत्रित पद्धतीने होत आहे. बहुतांश जागा व्यापल्या गेल्या आहेत. त्यातच लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरांमध्ये जागेची मागणी वाढली आहे. पण शहरांतील जागा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी शहरांपासून काही अंतरावर असणाऱ्या शहरवजा ग्रामीण भागांमध्ये स्थलांतर केले आहे. शहरवजा ग्रामीण भागांमध्ये आजही मोकळी जमीन आणि शेती उपलब्ध आहे. शहरी लोकसंख्या तिथे येऊ लागल्याने ती क्षेत्रे विकसित होऊ लागली आहेत, पण त्या विकासाबरोबर पाण्यासारख्या नैसर्गिक सुविधांचा गैरवापर वाढला असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे असे या अभ्यासात दिसून आले.

या चार गावांचा केला अभ्यास
आयआयटी मुंबईच्या तज्ञांनी मुंबईजवळील कर्जत तालुक्यामधील माणगाव तर्फ वसारे, मूळगाव तर्फ वसारे, कोंढाणे आणि साल्पे या चार गावांचा अभ्यास केला. तेथील जनगणना अहवाल तपासले. ग्रामस्थांचे सर्वेक्षण केले. गावांतील प्रमुख व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. गावांतील उपजीविकेची साधने, जमीन आणि पाण्याचा वापर आदींबाबत माहिती घेतली. त्यात पुढील बाबी अधोरेखित झाल्या-

  • 2001 पर्यंत 20 टक्के लोकांचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती होते.
  • 2011 पर्यंत फक्त 9 टक्केच लोक शेती करत होते.
  • सध्या शेतजमिनी खासगी कंपन्यांच्या ताब्यात आहेत.
  • पूर्वीचे शेतकरी आता वीटभट्टय़ांमध्ये काम करतात किंवा वाळू उत्खननाच्या रोजंदारीवर आहेत.
  • पूर्वी सुपीक जमीन होती त्या जागी आता श्रीमंतांची फार्महाऊस, बंगले आणि मंगल कार्यालये उभी आहेत.

वीटभट्ट्यांमुळे प्रदूषणात वाढ
कर्जतसारख्या शहरवजा ग्रामीण भागांमध्ये अनेक बेकायदेशीर वीटभट्ट्या सुरू आहेत. त्या भट्टय़ांमुळे रोजगार निर्माण झाले आणि आसपासच्या बांधकामांना कच्चा माल मिळाला. पण या भट्ट्यांमुळे पर्यावरण प्रदूषित होते. या भट्ट्यांना सलग पाणीपुरवठा आवश्यक असल्यामुळे नैसर्गिक संसाधनांवर ताण पडतो असे अभ्यासात दिसून आले.

उपसा वाढल्याने पाणीटंचाई
या भागातले वार्षिक पर्जन्यमान राष्ट्रीय सरासरीपेक्षा तिप्पट आहे. तरीही पावसाळय़ानंतर पाणीटंचाई सुरू होते. फार्महाऊस, हॉटेले, पिकांना पाणी देण्यासाठी खोदलेल्या कूपनलिकांमुळे भूजल पातळी खालावली आहे. गावांतील पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरीही कोरडय़ा पडल्या आहेत. शहरी गरजा भागवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्यात येते आणि बंधारे घातले जातात. त्यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे मतही तज्ञांनी या अभ्यासात मांडले. शहरवजा ग्रामीण भागांचे शहरी पद्धतीने नियोजन करण्याची गरज असून नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनात नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे असे मत प्रा. एल्डो यांनी व्यक्त केले.