दिवेआगरच्या मंदिरात पुन्हा विराजमान होणार सुवर्ण गणेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगरच्या मंदिरात पुन्हा एकदा सोन्याची गणेशमूर्ती विराजमान होणार आहे. वितळलेले सोने लवकरच न्यायालयीन बाबी पूर्ण झाल्यानंतर ट्रस्टच्या ताब्यात दिले जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली. त्यामुळे गणपतीच्या जयजयकाराने दिवेआगरचे मंदिर लखलखून जाणार आहे.

23 मार्च 2012 रोजी दिवेआगरच्या मंदिरातील सुवर्ण गणेशाचा मुखवटा व रत्नजडित हिरे याची चोरी करण्यात आली होती. दरोडेखोरांनी या मंदिरावर दरोडा टाकून मुखवटा तर पळवलाच पण रखवालदाराचीही हत्या केली होती. हे प्रकरण राज्यात गाजले. दरेडेखोरांनी गणपतीचा सोन्याचा मुखवटा वितळवून ते विकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पकडले. न्यायालयात हा खटला चालल्यानंतर 12 आरोपींना जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली.

आतापर्यंत हे सोने पोलिसांच्या ताब्यात होते. आता ते सरकारने स्वतःकडे घेतले असून लवकरच ट्रस्टकडे हे सोने सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज याबाबत खास बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, श्रीवर्धनचे माजी सभापती सुकुमार तोंडलेकर, सुजित तांदळेकर, सुवर्ण गणेश ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पिळणकर आदी उपस्थित होते. या निर्णयामुळे लवकरच सोन्याची मूर्ती पुन्हा नव्याने मंदिरात बसवली जाणार आहे.