
सामना प्रतिनिधी । नांदेड
गेल्या पाच वर्षांत झालेले दहशतवादी हल्ले पाहता सीमेवरचा जवान सुरक्षित नाही. 44 जवानांचे बलिदान झाले. दुसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांनी हल्ला केला. ती परिस्थिती भयावह असल्याचे सांगून पुलवामा हल्ल्याबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. परंतु देशाचे पंतप्रधान अनुपस्थित होते. ही अत्यंत गंभीर बाब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पंतप्रधानांना याबाबत गांर्भिय नव्हते. परंतु आम्ही एकजुटीने या बैठकीतील विषयांना संमती देऊन देशाच्या संरक्षणाला प्राधान्य दिले, असेही पवार म्हणाले.
नोटाबंदी आणि जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्याचेही ते म्हणाले. इंदिरा गांधी मैदानावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, पीआरपी आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीची महाराष्ट्रातील पहिली सभा आज बुधवारी झाली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, शेकापचे जयंत पाटील, पीआरपीचे जोगेंद्र कवाडे, नसीम खान, फौजिया खान, माजी मंत्री बसवराज पाटील, माणिकराव ठाकरे, संपतकुमार, आमदार विक्रम काळे, आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, आमदार अमिता चव्हाण, आमदार वसंत चव्हाण, आमदार डी. पी. सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

































































