
सामना ऑनलाईन,संयुक्त राष्ट्रसंघ
आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या प्रती आपल्या उत्तरदायित्वाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधारांना तातडीने सजा द्यावी असे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख ऍण्टोनियो गटरेस यांनी आज पाकिस्तानला बजावले. संयुक्त राष्ट्रसंघाचे सेक्रेटरी जनरल गटरेस यांचे पुलवामा हल्ल्याच्या विरोधातील पत्रक आज त्यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी प्रसृत केले. त्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांनी पुलवामा हल्ल्याचा तीक्र शब्दांत निषेध करतानाच दक्षिण आशियातील बिघडणाऱ्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी संयम कसोशीने पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले. आव्हाने कितीही मोठी असोत, परस्पर संवादातून त्यावर शांततेने समाधानकारक मात करता येते असा विश्वासही संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांनी व्यक्त केला. त्याला अनुसरून ऍण्टोनिया गटरेस हे हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात संवादाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढाकार घेतील काय, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांच्या प्रवक्त्यांना विचारला. त्यावर ‘दोन्ही राष्ट्रांनी तशी विनंती संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांना केली पाहिजे’, असे उत्तर प्रवक्ते डुजारिक यांनी दिले.



























































