
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या 11 दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू असताना पालिका आयुक्तांनी या शाळांना अनुदान देण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे आधी दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देणार्या आयुक्तांविरोधात पालिकेच्या महासभेत शिवसेनेसह सर्वपक्षीय गुरूवारी चांगलेच आक्रमक झाले. आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध करीत महासभा तहकूब करण्यात आली.
पालिकेच्या 71 विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला, मात्र आयुक्त याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी हरकतीचा मुद्दा मांडून विनाअनुदानित शिक्षकांची स्थिती निदर्शनास आणून दिली. शिवसेनेच्या या भूमिकेला सर्वपक्षीयांनी जोरदार पाठिंबा देत आयुक्तांच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध केला. यावेळी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे, सचिन पडवळ, अनिल पाटणवर, समीक्षा सक्रे, आदींनी आयुक्तांच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करीत विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी केली. प्रशासनाच्या बेजबाबदारपणाबद्दल सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सभा तहकुबी मांडली. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्याने महापौरांनी सभा तहकूब केली.
तातडीने निर्णय घ्या!
महापालिका अधिनियम 1888 च्या 61-क्यूनुसार प्राथमिक शिक्षण देणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे, मात्र पालिका आयुक्त गटनेत्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळेच हा प्रश्न आणखीन चिघळत चालला आहे. या विनाअनुदानित शाळांमधील शेकडो शिक्षक आणि या शाळांमध्ये शिकणार्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून पालिका प्रशासनाने या शाळांना अनुदान देण्यासाबाबत तातडीने निर्णय घेतला पाहिजे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने तातडीने सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले.
























































