
सामना प्रतिनिधी, डोंबिवली
खंबाळपाडा येथून रेल्वे रूळ क्रॉस करीत तिला पश्चिमेकडे जायचे होते. रेल्वे रूळ ओलांडत असतानाच कल्याणच्या दिशेने धडधडत लोकल आली. क्षणभर काय घडते आहे हेच तिला कळत नव्हते. मात्र प्रसंगावधान राखत ती महिला थेट रुळावरच आडवी झाली. एका क्षणात अख्खी लोकल तिच्या अंगावरून गेली. त्यानंतर ती महिला पुन्हा उभी राहिली. तिला खरचटलेदेखील नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. संपूर्ण लोकल अंगावरून जाऊनही ती जिवंत राहिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कमल शिंदे असे या 60 वर्षीय महिलेचे नाव असून ती डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील भोईरवाडीत राहते. सोमवारी 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 च्या सुमारास ती महिला ठाकुर्ली स्थानकाजवळ रूळ ओलांडत होती. त्याचवेळेस समोरून लोकल आली. क्षणाचाही विचार न करता स्लीपरवरच झोकून दिले. ठाकुर्ली स्थानकावरील प्रवासीही घाबरले. आता त्या महिलेचे काय होणार या भीतीने सर्वांचीच बोबडी वळली. काहीजण आरडाओरड करू लागले. मात्र लोकल निघून गेल्यानंतर कमल शिंदे या जिवंत असल्याचे दिसताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. दक्ष प्रवाशांनी तसेच सुरक्षा बलाचे जवान जितेंद्र कुमार आणि रोहित कुमार यांनी कमल शिंदे यांना ठाकुर्ली स्थानकात आणले. त्या भीतीने प्रचंड घाबरल्या होत्या. आरपीएफच्या जवानांनी त्यांना पाणी पाजले. केवळ नशीब म्हणून माझा जीव वाचला.. असे म्हणत त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. क्षणभरच्या चुकीने आपणास धडा मिळाला असून यापुढे कधीही रूळ ओलांडण्याची चूक करणार नाही असे त्यांनी सांगितले.
लोहमार्ग पोलिसांना पत्ताच नाही
रेल्वे रूळ ओलांडू नका असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जाते. जनजागृतीसाठी प्रवासी संघटना प्रयत्नशील असतात. तरीही वेळ वाचवण्याच्या नादात अनेकजण रूळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालतात. सोमवारच्या ठाकुर्ली स्थानकातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असतानाही लोहमार्ग पोलिसांना त्याची कोणतीच माहिती नव्हती. पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉटस् ऍप ग्रुपवर या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली.


























































