मौलिक विचारांचे धन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी सातपुते

मौलिक विचारांनी भारलेली पुस्तकं हेच आपले खरे धन. श्री. अ. वा. कोकजे यांचे अशाच मौलिक विचारांचा एक अनमोल खजिना देणारे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ‘A Multi-lingual collection of Thoughts on various subjects and Noteworthy Events, Records, Facts & Figures’ हे पुस्तक ज्ञान दिल्याने वाढते या उक्तीची साक्ष पटविणारे आहे.

प्रस्तुत पुस्तकात इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत असे चार भाषिक विभाग आहेत. प्रत्येक विभागात देशी-विदेशी लेखक, विद्वान, तत्त्वज्ञ इत्यादींचे विचार संकलित करण्यात आले आहेत. खरे तर अलीकडे उददुत, भ्दल्ऊल्ंा च्या काळात माहितीचा भडिमार होत असतो, पण अनेकदा ती विश्वासार्हतेच्या निकषावर थिटी पडते. शिवाय, माहितीच्या या पसाऱयात नेमके काय वाचावे हेही कळत नाही. अशा वेळी प्रस्तुत पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरू शकते. मुळात लेखक सुविद्य, व्यासंगी, बहुश्रुत असल्यामुळे त्यांनी निवडलेली विचारसूत्रे, सुभाषिते ही दर्जेदार आहेत. हे सारे ज्या ग्रंथांमधून घेण्यात आले, त्यांचे काही संदर्भही सोबत दिले आहेत. तसेच संस्कृत भाषा आज आपल्यापासून दुरावल्यासारखी झाली असली तरी त्या त्या संस्कृत वचनांचा सुबोध मराठी अर्थही लेखकाने या पुस्तकात दिला आहे हे सारे लक्षात घेता या पुस्तकाचे महत्त्व अधिक स्पष्ट होत जाते.

‘‘मानवाने निर्माण केलेली मंदिरे किंवा मशिदी उद्ध्वस्त झाल्या तरी एकवेळ चालेल, परंतु कुणाचेही हृदय मात्र दुखवू नये. कारण परमेश्वर तिथेच वास्तव्य करीत असतो.’’ सूफी संत बुलेशहा किंवा ‘‘यह सच है कि पानी में तैरनेवालेही डुबते है,… मगर किनारेपर खड़े रहनेवाले कभी तैरना नहीं सीख पाते।’’ सरदार वल्लभभाई पटेल किंवा ‘‘उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनौरथेः। न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः।।’’ हितोपदेश किंवा इंग्रजी विभागात पासून प्रत्येक वर्णाक्षरानुसार त्या त्या विषयांवरील सुवचने जसे ‘Face – There is no art to find the mind’s construction in the face – Shakespeare’ अशी या पुस्तकातील ही विचारमौक्तिके अर्थ व भाविक सौंदर्य या दोन्ही दृष्टींनी लक्षवेधी ठरतात.

सदाचार, परोपकार, खरा धर्म, अध्यात्म इत्यादी अनेकविध विषयांवरील सुभाषिते, मौलिक विचार इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत अशा भाषांमध्ये एकाच पुस्तकात वाचावयास मिळणे हा एक दुर्मिळ योग आहे. त्याचबरोबर, ‘विचारांची शक्ती’ ‘स्वावलंबन’ ‘Self-Reliance’ इत्यादी शीर्षकांतर्गत स्वामी विवेकानंद, गो. ग. आगरकर, साने गुरुजी, रमाकांत केणी, जेम्स ऍलन इत्यादींच्या लेखनाचे काही भागही या पुस्तकात देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्गापासून ते नोकरदार / व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येकाच्या दृष्टीने उपयुक्त असे बरेच काही प्रस्तुत पुस्तकात सापडते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात थोरामोठय़ांचे जाडजूड ग्रंथ वाचण्याइतकी उसंत आपल्याला नाही हे खरेच; पण आपल्या सवडीनुसार या पुस्तकातील कोणतेही पान उघडून वाचणे मात्र सहज शक्य आहे. पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले थोरामोठय़ांचे विचार म्हणजे त्यांनी एकूणच मानवी जीवनाविषयी केलेल्या चिंतन-मननाचे सार म्हणावे लागेल. म्हणूनच ते विचार कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीतील लोकांना कायमच दीपस्तंभासारखे दिशादर्शक ठरणारे आहेत. या पुस्तकात आपले मनोगत व्यक्त करताना लेखकाने म्हटल्याप्रमाणे हे मौलिक विचार मानवी जीवनाच्या व परस्पर संबंधांच्या सखोल अभ्यासातून काढलेले निष्कर्ष आहेत. त्यातून कधी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात, तर कधी ते आपणांस अंतर्मुख करून आत्मपरीक्षणास प्रवृत्त करतात.

म्हणूनच हे पुस्तक आपल्या संग्रही असलेच पाहिजे. कोणालाही भेट देण्यासाठीसुद्धा हे पुस्तक एक उत्तम पर्याय ठरू शकेल. कारण त्यानिमित्ताने अनमोल असे विचारधन पुढल्या पिढीकडे सोपविण्याची संधी आपल्याला मिळेल. अशा या ‘अक्षरधनाची ही अक्षय भेट’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून आपल्या सर्वांनाच समृद्ध करणारी ठरेल हे नक्की.