आरक्षणासाठी लिंगायत समाजाचा आझाद मैदानात आज मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रातील 85 लाख वीरशैव-लिंगायत समाजातील हिंदू लिंगायत या जातीसह उर्वरित 32 जातींचा ओबीसी, एसबीसी व एनटी प्रवर्गात समावेश करून त्यांना आरक्षण लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने 25 फेब्रुवारीला आझाद मैदानावर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

शिवा संघटनेसोबत एका महिन्याच्या आत बैठक घेऊन सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत 18 मे 2018 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दिले होते. पण त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. या मागण्यांवर बैठक बोलवण्यासाठी मागील चार वर्षांत मुख्यमंत्र्यांना 31 वेळा निवेदन दिले. पण एकही मागणी मंजूर न झाल्याने महाराष्ट्रातील 85 लाख वीरशैव-लिंगायत समाजात नाराजी आहे.

त्यामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिवा संघटनेच्या वतीने आझाद मैदानात एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे म्हणाले.

प्रमुख मागण्या

  • राज्यातील वीरशैव-लिंगायत समाजाच्या 21 जातींचा ओबीसी व एसबीसी प्रवर्गात समावेश झाला आहे. या सर्व जातींचाकेंद्र सरकारच्या ओबीसी प्रवर्गाच्या यादीत समावेश करण्यासाठी पाठपुरावा करणे.
  • सोलापूरच्या विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर विद्यापीठ नाव देण्यात यावे.
  • महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून प्रत्येक वर्षाला 100 कोटी रुपयांची तरतूद करावी.
  • सोलापूर जिह्यातील मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू करावे.
  • सोलापूर रेल्वे स्थानकाला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस, सोलापूर असे नाव देण्यात यावे.