काँग्रेस नेते सुरेश पाटील यांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. सदाशिव गायके आणि बँकेचे माजी संचालक नाना पाटील यांच्या सततच्या छळाला कंटाळून आपण हे शेवटचे पाऊल उचल्याचे सुरेश पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार सदाशिव गायके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि सुरेश पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सुरेश पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली असून त्यांच्या हस्ताक्षराची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या खोलीतील एक डायरी ताब्यात घेतले आहे.

सदाशिव गायके यांनी सोमवारी सकाळीच सुरेश पाटील यांच्याविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली होती. सकाळी मॉर्निंग वॉक घेत असताना 2 अपहरणकर्त्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मी आरडाओरडा केल्यानंतर अपहरणासाठी आलेले तरुण पळून गेले. सुरेश पाटील या तरुणांना इशारा करत असल्याचे मी स्वतः बघितले, अशी फिर्याद सदाशिव गायके यांनी वेदांत नगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार सुरेश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीची शहानिशा पोलिसांकडून होण्यापूर्वीच सुरेश पाटील यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.