
सामना प्रतिनिधी। ठाणे
ज्याच्याबरोबर आयुष्याची खुणगाठ बांधली गेली तो पती मेजर प्रसाद दोन वर्षांपूर्वी इंडो-चायना बॉर्डरवरील तवांग सेक्टरमध्ये शहीद झाला. त्यामुळे सर्वस्व गमावल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. मात्र दुःखाला कवटाळून न बसता थेट दुर्गेचं रूप धारण केलं आणि आता ती लवकरच सैन्य दलात दाखल होणार आहे. या बहाद्दर वीरपत्नीचे नाव आहे गौरी महाडिक. शत्रूशी दोन हात करण्यासाठी ती सज्ज झाली असून आपल्या पतीला अनोखी मानवंदना देऊन देशाची सेवा करण्याचा निर्धार केला आहे.
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्करी तंबूला भीषण आग लागून त्यात विरारचे सुपुत्र मेजर प्रसाद महाडिक यांना 30 डिसेंबर 2017 रोजी वीरमरण आले. विरारमधील बोळींज गावात राहणाऱया महाडिक कुटुंबीयांस मोठा हादरा बसला. पत्नी गौरी हिच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. तरीही या दुःखावर मात करीत गौरी यांनी पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट लष्करामध्येच दाखल होण्याचा निर्णय घेतला.
गौरी महाडिक या वकील असून एका नामांकित कंपनीमध्ये मोठय़ा पदावर काम करीत होत्या, मात्र लष्करात भरती होण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी ही नोकरी सोडली आणि लष्करी भरतीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची ऑनलाइन परीक्षा प्रथम क्रमांक मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या असून चेन्नई येथे एप्रिलमध्ये होणाऱया लष्करी अधिकारी प्रशिक्षण केंद्रात दाखल होणार आहेत. या केंद्रामधून 49 आठवडे प्रशिक्षण मिळणार असून त्यानंतर थेट लेफ्टनंट पदावर गौरी महाडिक यांची नियुक्ती केली जाणार आहे. ही खडतर परीक्षा पास झाल्याचे समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुलाची पोकळी सून भरून काढणार
देशासाठी माझा मुलगा शहीद झाला, पण आता सून गौरी ही लष्करात दाखल होणार असून तीच आता मुलाची पोकळी भरून काढणार आहे. तिच्या देशभक्तीची जिगर सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल अशी प्रतिक्रिया शहीद प्रसाद यांचे वडील गणेश महाडिक यांनी व्यक्त केली.
रडत बसणे मला मंजूर नाही!
2015 साली माझं मेजर प्रसाद यांच्याबरोबर लग्न झालं. आमचा संसार सुखाने सुरू होता, पण अचानक प्रसाद हे तवांग सेक्टरमध्ये डय़ुटीवर असताना शहीद झाले. आपल्यावर कितीही मोठं संकट आलं तरी त्यावर मात कशी करायची हे मी पतीकडूनच शिकले. एका जागी बसून रडत राहणं मला शक्यच नव्हतं. त्यांना मला नेहमी आनंदी आणि हसताना पाहायचे होते. त्यामुळेच मी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. आता त्यांचाच गणवेश परिधान करून देशाची सेवा करणार आणि पतीचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचे गौरी महाडिक यांनी सांगितले.


























































