
सामना प्रतिनिधी । मालवण
मोटरसायकलने मालवणहून देवबागच्या दिशेने जात असताना रस्त्यावर गुरे आडवी आल्याने ब्रेक लावलेली मोटरसायकल रस्त्यालगतच्या दगडी कुंपणास आदळून अपघात झाला. या अपघातात गंभीर दुखापत व अतिरक्तस्राव झाल्याने दुचाकीस्वार गणेश लक्ष्मण किडये (वय 26) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीनजीक भगत यांच्या घरासमोरील रस्त्यावर मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अपघात घडला. गणेश सकाळी दुचाकी घेऊन मालवणहून देवबागच्या दिशेने जात होता. तो वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीनजीकच्या रस्त्यावर आला असता समोरून अचानक गुरे आडवी आली. त्यामुळे त्याने ब्रेक लावला असता त्याचा गाडीवरील ताबा सुटून तो रस्त्यावर फेकला गेला. या रस्त्यालगत दगडी कुंपण असल्याने तो त्यावर आदळला. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त समजताच वायरी भुतनाथ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस कर्मचारी संतोष गलोले घटनास्थळी दाखल झाले. गणेश याचा मृतदेह विच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. बसस्थानक परिसरात राहणारा गणेश रिक्षाचालक होता. त्याचबरोबर मोटार डायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम पाहत होता. आंगणेवाडीची यात्रा असल्याने तो पहाटेपर्यंत भाविकांची रिक्षातून ने-आण करत होता. त्यानंतर तो देवबाग येथे जात असता त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. दुपारी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.


























































