
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
वयस्कर माणसांना सरकारतर्फे प्रत्येकी 15 हजार रुपये मिळत आहे. तुम्ही तहसीलमध्ये चला तुम्हाला पैसे मिळवुन देतो असे सांगून नैताळे येथील एक वृद्ध महिला मुलांबी जमाल शेख हिचे चार तोळाचे सोन्याचे 98 हजार रुपयांचे दागिने लांबवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी 2 वाजता तहसिल कार्यालयात घडली. वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नैताळा ता. निफाड येथील वृद्ध महिला मुलांबी जमाल शेख सोमवारी गांधीनगर येथे नातेवार्इंकांच्या लग्नासाठी दुपारी 2 वाजता शेजारी रहाणारी हमीदा अमिरखॉन पठाण हिचेबरोबर कोपरगांवला एस. टी. स्टॅन्डवर आल्या. त्याचवेळेस गोरटा उंचापुरा डोक्यावर कॅप घातलेला व्यक्ती जवळ आला व वृद्ध लोकांना सरकारने 15 हजार रुपये मंजूर केले आहे. ते तुम्हाला मिळवून देतो, तुम्ही माझेबरोबर तहसील कार्यालयात चला, असे म्हणाला. पैसे मिळतील या आशेने या दोघी त्या व्यक्तीबरोबर रिक्षाने तहसील कार्यालयात गेल्या. मुलांबी यांचे गळयात तिन तोळे सोन्याची तिन पदराची मोठी पोत,अर्धा तोळा वजनाची सोन्याची छोटी पोत,चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स अशा सोन्याच्या वस्तु मुलांबी यांना त्याने तिच्या पाकीटात घालायला सांगितले. त्या वस्तू सोबत आलेल्या हमीदाकडे देण्यास सांगितले. हमीदाला त्याने तहसील कार्यालयाच्या बाहेर बसवले. मी मुलांबी यांना घेवून जातो तिच्या सहया/आंगठे घेतो व हिला पैसे मिळवून देतो, असे सांगून मुलांबी यांना घेवून तो तहसील कार्यालयात गेला. मुलांबी हिची नजर चुकवून भामटा तहसील कार्यालयाबाहेर बसलेल्या हमीदाकडे आला व सोन्याचे दागिने ठेवलेले पाकीट माझ्याकडे दे त्यांचे काम आहे, असे म्हणून पाकीट घेवून त्याने पोबारा केला. बराच वेळ झाला हा माणूस आला नाही म्हणून मुलांबी हमीदाजवळ आली व त्या माणसाची विचारणा केली. तर हमीदा हिने त्या माणसाने दागिने व व रोख रु 1000 असे पैशाचे ते पाकीट कामासाठी हवे आहे असे सांगून घेवून गेल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीस भोवळ आली व आपण फसले गेलो हे लक्षात आले. त्यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे.
























































