
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
राज्याच्या शिक्षण विभागात विभागीय सचिव असल्याची बतावणी करून कसाल येथील परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थिनींना कॉपी पुरविण्याचा प्रकार विजय रणसिंग नावाच्या व्यक्तीने बुधवारी केला. याबाबतची तक्रार संस्था चालकांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, विजय रणसिंग याने यापूर्वीही शिक्षण विभागाचा विभागीय सचिव असल्याची बतावणी करून अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभाग ‘विभागीय सचिव’ या नावाची आलिशान कारवर पाटी, तिरंगा झेंडा तसेच महाराष्ट्र शासन असे नाव लिहिलेली गाडी घेऊन विजय रणसिंग नावाची व्यक्ती गेले आठ दिवस सिंधुदुर्गात फिरत आहे. गुरूवारी ही व्यक्ती आपल्या आलिशान गाडीसह न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे सकाळी 10.30 वाजता आली. तेथे त्याने बारावी परीक्षेचा केंद्र व्हिजिटर असल्याचे सांगितले. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी अवधूत मालणकर, प्रभाकर सावंत तेथे उपस्थित होते. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना विजय रणसिंग गोंधळला. त्यामुळे त्याच्याबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर विजय रणसिंग याने त्या केंद्रातून काढता पाय घेतला.
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विजय रणसिंग पुन्हा कसाल परीक्षा केंद्रावर आला. आपले नातेवाईक परीक्षेला बसले आहेत. त्यांना मदत करावयाची असल्याचे सांगून त्याने वर्गात प्रवेश केला. तसेच दोन विद्यार्थिनींना कॉपी देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व इतर अधिकार्यांनी हा डाव हाणून पाडला. त्यामुळे विजय रणसिंग पुन्हा तेथून पोबारा केला. त्यानंतर संस्था पदाधिकारी प्रभाकर सावंत यांनी थेट शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यावेळी अशा प्रकारचा कोणताही अधिकारी नसल्याचे लेखी पत्र शालेय शिक्षण विभागाकडून पाठविण्यात आले. तसेच तोतया विभागीय सचिव विजय रणसिंग यावी चौकशी करावी अशी मागणी संस्थाचालक तसेच मुख्याध्यापकांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे.
परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणारा विजय रणसिंगसह अन्य दोन साथीदार कणकवली पोलिसांच्या ताब्यात सिंधुदुर्गातील बारावीच्या अनेक परीक्षा केंद्रावर जाऊन धडकणार्या विजय रणसिंग याला त्याच्या दोन साथीदारांसह कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वापरत असलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या विजय रणसिंगची चौकशी सुरू असून तो पोलिसांना उलट सुलट उत्तरे देत आहे. रणसिंग याने बुधवारी पणदूर आणि कणकवलीतील एस.एम.हायस्कूल परीक्षा केंद्रावर हजेरी लावली होती. विजय रणसिंग याने शालेय शिक्षण विभागाचे बोगस व्हिजिटिंग कार्ड तयार केले आहे. तसेच महाराष्ट्र शासन असे आपल्या वाहनावर मागे पुढे नाव लिहून तसेच विभागीय सचिव अशी पाटील लावून तो गेले आठ दिवस जिल्ह्यातील विविध केंद्रांवर जाऊन भेटी देत आहे. या भेटीत त्याने कुणाला गंडा घातला किंवा काय गैरप्रकार केले याचा तपास कणकवली पोलीस करीत आहेत. विजय रणसिंग याच्यासोबत वाहन चालक आणि त्याचा लिपिक म्हणून काम करणार्या अन्य दोघांनाही कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयुराज वसंत शिर्के आणि लक्ष्मण कल्याण बंडगर अशी त्यांची नावे आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या भरारी पथकाला विजय रणसिंग हा जानवली ते कणकवली दरम्यान प्रवास करताना आढळला. त्यांनी तातडीने पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला. यानंतर जाणवली पुलालगत मनोहर शिल्पनजिक विजय रणसिंगसह चालक लक्ष्मण बंडगर आणि असिस्टंट मयुराज वसंत शिर्के याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.

























































