लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हयात 48 भरारी पथकांची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vote

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली असून 200 अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हयामध्ये 48 भरारी पथकांची स्थापना केल्याची माहिती निवडणूक शाखेचे तहसिलदार उमेश पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यामध्ये विविध व्हीव्हीपॅटच्या 5454 मशीन दाखल झाल्या आहेत. तर 8673 बॅलेट युनीट आणि 547 कंट्रोल युनिट दाखल झाले आहेत. नगर जिल्हयामध्ये 2 ठिकाणी ही मशीन ठेवण्यात आली आहे.

लोकसभेच्या तयारीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना गेल्या दोन दिवसापसून प्रशिक्षण दिले जात आहे. अतापर्यंत 200 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नगर जिल्हयात 12 विधानसभा मतदार केंद्र असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 4 असे एकुण 48 भरारी पथकांची स्थापना केली आहे. तर व्हीडीओ पाहणी टिम एकूण 36 ठिकाणी कार्यन्वीत करण्यात आली आहे. नव्याने सी-व्हीजीलन्स अ‍ॅप तयार केले जाणार असून त्याचेही काम सुरू आहे. नगर जिल्हयामध्ये एकूण 3722 बुथ आहेत. यामध्ये 1703 हे नगर दक्षिण मतदार संघात तर 2019 हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहेत. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

मतदार यादीत नावे नसलेल्यांना नगर जिल्ह्यामध्ये 2 व 3 मार्च रोजी नावे समाविष्ट करता येणार आहे. त्याकरीता ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीत नाव नसलेल्यांनी संबंधीत मतदार केंद्रावर नाव नोंदणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.