मुंबईकर सर्दी-खोकला, ताप, अंगदुखीने हैराण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

दिवसा उन्हाच्या चटक्यांनी हैराण होणाऱ्या मुंबईकरांना रात्री वातावरणात निर्माण होणाऱ्या गारव्यामुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे. अनेकांना सर्दी-खोकला, ताप, अंगदुखीने हैराण केले असून पालिका रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांची संख्या आठवडाभरात तब्बल दहा टक्क्यांनी वाढली आहे.

कित्येक वर्षांनी यंदा मुंबईकरांना लांबलेल्या थंडीचा अनुभव घेता येत आहे, मात्र गेल्या 10 ते 15 दिवसांपासून दिवसा उकाडा तर रात्री थंडी असे वातावरण सुरू आहे. कमाल आणि किमान तापमानात अचानक होणाऱ्या या बदलांमुळे जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सर्दी-खोकला, अंगदुखी, घसा इन्फेक्शन, ताप असे आजार वाढले आहेत. शिवाय बदललेल्या हवामानामुळे हृदयविकार, मधुमेह, ब्लडप्रेशरच्या रुग्णांवरही याचा परिणाम होत आहे. दरम्यान, केईएम रुग्णालयात अशा रुग्णांची 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी सांगितले. मात्र रुग्ण वाढले असले तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुरेशी यंत्रणा सक्षम ठेवण्यात आली असून येणाऱया प्रत्येक रुग्णावर आवश्यक ते सर्व उपचार केले जात असल्याचेही देशमुख म्हणाले.

अरबी समुद्रातील वाऱ्यांनी आणली थंडी
अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत गारवा निर्माण झाल्याचे स्कायमेटच्या महेश पलावत यांनी सांगितले. आज शुक्रवारी सांताक्रुझ येथे 16.2 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची तर कुलाब्यात 20.5 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस मुंबईत असाच गारवा राहील, असेही पलावत यांनी सांगितले.

पूर्वेकडील वाऱ्यांमुळे तापमानात वाढ
पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे दिवसा वातावरणात तापमान वाढत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. हीच स्थिती आणखी आठवडाभर राहणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पालिकेच्या नायर, शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातही अशा आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आली आहे.

हवामान कमाल किमान
कुलाबा 29.8 अं. से. 20.5 अं. से.
सांताक्रुझ 31.7 अं. सें. 18.2 अं. से.