
>> कर्नल अभय बा. पटवर्धन
गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून हिंदुस्थानविरुद्ध छुपे युद्ध लढत आहे, पण हिंदुस्थानने जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली तेव्हा पाकिस्तानने अण्वस्त्र्ाहल्ल्याची धमकी दिली. या धमकीमुळे हिंदुस्थानने नेहमीच संयम बाळगला, पण याचा गैरफायदा घेत पाकिस्तान सोकावत गेला आणि दहशतवादी हल्ल्यांत हजारो हिंदुस्थानी सैनिक व नागरिक मारले गेले, पण पुलवामानंतर 12 दिवसांनी हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरमध्ये एअर स्ट्राइक करून पाकिस्तानला जबरदस्त दणका दिला आहे. हिंदुस्थानी वायुसेनेने नुकतीच केलेली ही कारवाई अनेक अर्थांनी वैशिष्टय़पूर्ण आहे. अर्थात त्यामुळे चेकाळून उठलेला पाक आणि जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भविष्यात याचा बदला घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. त्यामुळे हिंदुस्थानला यापुढे नेहमीपेक्षा जास्त सतर्क राहावे लागणार आहे…
पुलवामावर झालेल्या भ्याड भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची, प्रत्युत्तर देण्याची मागणी होत होती. आपले सहकारी शहीद झाल्यामुळे सैन्यामध्येही प्रचंड रोषाचे आणि संतापाचे वातावरण होते, पण लष्कराने नेहमीप्रमाणे ‘‘योग्य वेळी योग्य ठिकाणी धडा शिकवू’’ असे संयमाचे उत्तर दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुलवामातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल असे सांगतानाच लष्कराला कारवाई करण्याचे सर्व स्वातंत्र्य दिल्याचे जाहीरपणाने सांगितले होते. त्यानुसार 12 दिवसांनी हिंदुस्थानने पाकिस्तानला जबरदस्त तडाखा दिला आहे.हिंदुस्थानच्या ‘मिराज 2000’ या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात एअर ऍटॅक करून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये तीनशेहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. ही कारवाई अतिशय धाडसी, अचूक, गोपनीय आणि तितकीच कठोर होती. त्याबद्दल वायुसेनेचे अभिनंदन करावयास हवे.
ही कारवाई अनेक अर्थांनी वैशिष्टय़पूर्ण होती. सर्वात महत्त्वाची दोन वैशिष्टय़े म्हणजे या कारवाईमध्ये आपल्या एकाही विमानाचे अथवा जवानाचे नुकसान झालेले नाही. दुसरीकडे, पाकिस्तानी सामान्य नागरिकांना याची कसलीही इजा झालेली नाही. एअरबेसपासून जवळपास 800 ते 1000 किलोमीटर दूर जाऊन हा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे इतके अंतर दूर जाऊन परतण्यासाठी लागणारे इंधन हे टँकरद्वारे हवेतच बदलण्यात आले. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली मिराज-2000 ही लढाऊ विमाने दसॉल्ट या फ्रान्समधील कंपनीने बनवलेली आहेत. 2336 कि.मी. प्रति तास वेगाने ही विमाने उड्डाण करू शकतात. एका मिनिटात 125 गोळ्यांचे राऊंड फायर करण्याची त्यांची क्षमता असते, तर एका मिनिटात 68 मिमीची 18 रॉकेट ती डागू शकतात. मिराज या लढाऊ विमानांची नेव्हिगेशन सिस्टम ही अत्यंत अचूक आहे. एक चौरस मीटरपर्यंत ही प्रणाली मॅपिंग करू शकते. तसेच यामध्ये वापरण्यात आलेली क्षेपणास्त्र्ाs किंवा बॉम्ब हेदेखील अत्यंत कुशलतेने गाईडेड असल्यामुळे तेही अचूकपणाने लक्ष्यावर मारा करू शकतात. या विमानांमधून 250 किलोपासून 1000 किलोपर्यंत बॉम्ब किंवा क्षेपणास्त्र् वाहून नेली जाऊ शकतात. आताच्या कारवाईबाबत समोर आलेल्या माहितीनुसार 1000 किलोचे बॉम्ब टाकण्यात आले आहेत. तथापि, हजार किलोचा एक बॉम्ब वापरला की 500 किलोचे दोन, की 250 किलोचे चार वापरले हे समोर आलेले नाही आणि गोपनीयतेचा भाग म्हणून एअरफोर्सकडून ते कधीही सांगितलेही जाणार नाही. तथापि, एका विमानात 1000 किलोचे बॉम्ब असतील असे मानल्यास या कारवाईत आपण पीओकेमध्ये 12 हजार किलोचे बॉम्ब टाकलेले आहेत. बालाकोटजवळ एकाच ठिकाणी हे बॉम्ब टाकले असतील तर जवळपास 4 किलोमीटर बाय 4 किलोमीटर इतका मोठा परिसर पूर्णतः उद्ध्वस्त झाला असेल. तिथे काहीही शिल्लक नसेल. यावरून या बॉम्बची ताकद लक्षात येते. हे बॉम्ब अतिशय महाग असतात आणि फ्रान्सने आपल्याला अत्यंत उत्कृष्ट बॉम्ब दिलेले आहेत यात काहीही शंकाच नाही.
परिणाम काय होतील?
या हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करणे होते. मागील काळात मसूद अजहरचा भाचा मारला गेला आणि त्याचा बदला म्हणून त्याने पुलवामावर हल्ला केला. ताज्या एअर स्ट्राइकमध्ये अजहरचा मेहुणा मारला गेल्याचे समजते आहे. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी मसूद अजहर हिंदुस्थानात कुठे ना कुठे कारवाई करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट म्हणजे, पहिल्यांदा पाकिस्तानने हे मान्य केले आहे की, हिंदुस्थानने त्यांच्यावर हल्ला केला आहे. मागच्या वेळी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने आमच्यावर हल्ला झालाच नाही असे सांगत हात झटकले होते. इतकेच नव्हे, तर विदेशी राजदूत आणि विदेशी पत्रकारांना घेऊन खोटी जागा दाखवली होती आणि हिंदुस्थानने कारवाई केलीच नसल्याचे म्हटले होते. यावेळी पाकिस्तानने हिंदुस्थानी विमानांनी बॉम्बहल्ला केला, पण आमचे काहीच नुकसान झालेले नाही असे म्हटले आहे. आता ते कोणता भाग दाखवणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. कारण सर्जिकल स्ट्राइकमध्ये बंदुकीने किंवा रॉकेट लाँचरने डागलेली मिसाईल्स छोटी असतात, पण एअर स्ट्राइकमध्ये बॉम्बवर्षाव झाल्यामुळे मोठी जमीन बाधित झालेली असणार आहे. त्यामुळे यावेळी पाकिस्तान काय खोटे बोलतो हे पाहावे लागेल.
आजवर पाकिस्तान हिंदुस्थानला सातत्याने अण्वस्त्र्ाहल्ल्याची धमकी देत आला आहे. या धमकीमुळेच हिंदुस्थानने असंख्य दहशतवादी हल्ले झेलून आणि सोसूनही संयमाची भूमिकाच घेत राहिला. 2001 आणि 2008 मध्ये सैन्याने हल्ल्याची परवानगी मागूनही अण्वस्त्र्ाांच्या भीतीने हिंदुस्थानने आपले पाऊल मागे घेत संयमी भूमिका घेतली, पण यावेळी हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या या ब्लॅकमेलिंग टेक्निकला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पाकिस्तान नक्कीच भेदरलेला आहे.
अर्थात, कितीही घाबरला तरी पाकिस्तानी लष्कराला आणि राजकीय नेतृत्वाला तेथील जनतेला, तेथील मूलतत्त्ववाद्यांना उत्तर देण्यासाठी काहीतरी ऍक्शन घ्यावी लागणार आहे. यासाठी दोन पर्याय पाकिस्तानपुढे आहेत. एक म्हणजे हिंदुस्थानवर हवाई हल्ले करणे, पण ते शक्य नाही. कारण हिंदुस्थान किमान एक महिना तरी पूर्णपणे हवाई सुरक्षेबाबत हाय ऍलर्टवर आहे. त्यामुळेच पाकिस्तान दुसरा पर्याय वापरू शकतो, तो म्हणजे हिंदुस्थानात अंतर्गत हल्ले करण्याचा. यासाठी केवळ कश्मीरच नव्हे तर देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू आदी महानगरांना लक्ष्य केले जाऊ शकते हे लक्षात घेता आता केवळ सुरक्षा यंत्रणांची, पोलिसांची, गुप्तचर यंत्रणांचीच नव्हे तर आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. सर्वांनीच येणाऱया काळात अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. आपल्या जवळपास कोणतीही संशयित हालचाल घडत असेल तर तत्काळ पोलिसांना कळवले पाहिजे. पोलिसांनीही आपल्या ऑपरेशन रूम उघडल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे संशयित हालचालींची माहिती देणाऱयाला उलटचौकशी न करता, त्रास न देता ती जाणून घेऊन वरिष्ठांपर्यंत आणि संबंधितांपर्यंत पोहोचवून पुढील कारवाई केली पाहिजे.
सारांश, आज हिंदुस्थान खऱया अर्थाने बदलत असल्याचे या हल्ल्याने सूचित केले असून यातून पाकिस्तानसह संपूर्ण जगाला इशारा दिला गेलेला आहे. या हल्ल्याबाबत वायुदलाचे, सैन्याचे कौतुक करतानाच येणाऱया काळात त्याचे राजकारण होणार नाही याची जबाबदारीही राजकीय नेत्यांनी पार पाडायला हवी. मागील सर्जिकल स्ट्राइकनंतर विरोधी पक्षांनी त्याचे फोटो दाखवा असे म्हटले होते. तसा प्रकार आता होता कामा नये.
सुगावा कसा लागला नाही?
– प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) हिंदुस्थानने प्रत्येक पोस्टवर ऍण्टी-एअरक्राफ्ट मशीनगन बसवलेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण संपूर्ण सीमारेषेवर ऍण्टी-एअरक्राफ्ट गनही बसवलेल्या आहेत. तसेच सीमेवरील बटालियनकडे ऍण्टी-एअरक्राफ्ट मिसाईल्सही असतात. पाकिस्तानकडे तर स्ट्रिंजर मिसाईल्स आहेत. याच मिसाईल्सच्या साहाय्याने पाकिस्तानने कारगील युद्धाच्या वेळी हिंदुस्थानची दोन मिग विमाने पाडली होती. पुलवामावरील हल्ल्यानंतर हिंदुस्थानने दिलेला इशारा लक्षात घेता पाकिस्तानने ही सर्व क्षेपणास्त्र्ाs सज्ज ठेवलेली असणार आहेत. मात्र या सर्वांना चकवा देऊन हिंदुस्थानी विमाने एलओसी पार करून गेली ही गोष्ट थक्क करणारी आहे.
– एलओसीपासून बालाकोट 100 ते 125 किलोमीटर अंतरावर आहे. यातील हवाई अंतर 75 किलोमीटर असून ते पार करण्यास लढाऊ विमानांना सुमारे 7 ते 8 मिनिटे लागतात. मात्र तरीही पाकिस्तानच्या यंत्रणांना त्याचा पत्ता लागला नाही. ही विमाने जमिंनीपासून 100 ते 150 फूट उंचीवरून गेली असण्याची शक्यता आहे. श्रीनगर किंवा अवंतीपूर या एअरबेसवरून उड्डाण करून आपल्या बाजूचे कंदहार पार करून किशनगंगा नदी, मुजफ्फराबाद पार करून बालाकोटला जावे लागते. हा मार्ग हाजीपूरच्या जवळचा आहे हे अनेकांना माहीत नसेल. मुजफ्फराबादपासून हाजीपूर 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे पाकिस्तानची ऍण्टी-एअरक्राफ्ट प्रणाली निfिश्चतपणे असणार आहे. मात्र त्यांनाही हिंदुस्थानी लढाऊ विमानांनी चकवा दिला. हे कौशल्य अनन्यसाधारण आणि कौतुकास्पद आहे.
– तब्बल 12 विमाने आवाज करत जातात आणि बॉम्बवर्षाव करत परततात याची जाणीव पाकिस्तानला त्यादरम्यान कधी ना कधी झालेली असणार आहे. मात्र पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानचे एअरबेस नाहीत. ते प्रामुख्याने पंजाब आणि इतरत्र आहेत. तेथून पाकव्याप्त कश्मीरमध्ये यायला पाक विमानांना 15 ते 20 मिनिटे लागतात, पण तेवढय़ात हिंदुस्थानी विमाने मिशन फत्ते करून परतली आणि पाकिस्तान हातावर हात चोळत बसला.

























































