
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. यामुळे पालिकेच्या एकूण 30,692 कोटींच्या अर्थसंकल्पातील 12 हजार कोटी कर्मचाऱयांचा पगार आणि थकबाकीवर खर्च होणार आहे. पगारावर होणारा खर्च वाढल्यामुळे यापुढे पालिकेला जपून खर्च करावा लागणार असल्याचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. पालिकेचा 2019-20चा अर्थसंकल्प आज सभागृहात मंजूर करण्यात आला.
पालिका आयुक्तांनी 4 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीने विशेष सभेमध्ये झालेल्या चर्चेनंतर अर्थसंकल्प मंजूर केला. यानंतर महासभेत सर्वपक्षीय गटनेत्यांनी सूचना मांडल्यानंतर आज अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्याचे महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले.
मंजूर अर्थसंकल्पातील निधीच्या तरतुदीनुसार काम होत आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक विभागवार बैठका घेऊन आढावा घेतला जाणार असल्याचे यावेळी आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. गेल्या वर्षीपर्यंत कर्मचाऱयांच्या पगारावर एकूण अर्थसंकल्पातील 48 टक्के खर्च होत होता, मात्र आता सातव्या वेतन आयोगामुळे पगार आणि थकबाकी देण्यासाठी खर्च वाढणार असल्याचे ते म्हणाले. हा खर्च भागवण्यासाठीच अर्थसंकल्पात वाढ केलेल्या 3400 कोटींच्या निधीचा उपयोग होणार असल्याचे ते म्हणाले. सातवा वेतन आयोग लागू करताना 1 जानेवारी 2016 पासून मार्च 2019 पर्यंतची थकबाकी द्यावी लागणार आहे. यासाठी 3700 कोटी खर्च येणार असल्याचे ते म्हणाले.
ठळक वैशिष्टय़े
ठेवींमधील 22900 कोटी रुपये कर्मचाऱयांची पेन्शन, प्रॉव्हिडंट फंडासाठी राखीव.
ठेवींमध्ये उरलेल्या 53 हजार कोटी मोठय़ा प्रकल्पांसाठी वापरणार.
22,000 शौचालये बांधण्यासाठी 650 कोटी रुपये खर्च करणार
दर्जेदार रस्ते-खड्डे भरणे यासाठी अभियंत्यांना आयआयटीकडून प्रशिक्षण देणार
आरोग्य केंद्रे दिवसरात्र सुरू ठेवणार, सुविधा वाढवणार.
टेंडरनुसार काम होणे, कामाचा दर्जा राखण्यासाठी ऑनलाइन कॉम्प्युटर मॉनेटरिंग राहणार.
विकास आराखडय़ानुसार 2034 पर्यंत आठ लाख नोकऱया निर्माण होणार.
उद्योगधंदे वाढवण्यासाठी कमर्शियल स्पेस वाढवणार.
माहुलमध्ये 2799 चौरस मीटरवर अद्ययावत रुग्णालय.
पाणी तुंबणे टाळण्यासाठी बांधकामांना परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग असणे बंधनकारक करणार.
जमिनीखाली कचरा पेटय़ा प्रक्रिया केंद्र सुरू करून डंपिंग ग्राऊंडमुक्त मुंबई करणार.
असे उत्पन्न, असा खर्च
पालिकेचे एकूण वार्षिक उत्पन्न 24,900 कोटी आहे. यातील 19,200 कोटी रुपये वीज, भाडे, पंप, पगार आदीवर खर्च होतो. त्यामुळे भांडवली खर्चासाठी केवळ 5700 कोटी शिल्लक राहतात. मात्र मुंबईकरांना सेवासुविधा देण्यासाठी नागरी सुविधांवर खर्च करणे अनिवार्य असते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या
76 हजार कोटी ठेवींतील रक्कम वापरण्यात येणार आहे. यासाठी 11,480 कोटींच्या भांडवली खर्चासाठी आवश्यक असणाऱया 5700 कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार आहेत.



























































