जाडा म्हटलं म्हणून मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सख्ख्या भावंडांमध्ये चिडवाचिडवी असणं ही तशी नेहमीची बाब. पण, हीच चिडवाचिडवी दिल्लीतील एका तरुणाच्या जिवावर बेतली आहे. भावाला जाडा म्हणून चिडवल्यामुळे एका तरुणाची भावाकडून हत्या झाली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या नंदनगरी भागात ही घटना घडली. येथे निजाम (28) आणि आरिफ (25) असे दोन भाऊ राहत होते. आरिफ वरचेवर निजामला त्याच्या जाडेपणावरून चिडवत असे. रविवारीही आरिफने निजामला जाडा म्हणून चिडवलं. त्यावर संतापलेल्या निजामने आरिफशी भांडायला सुरुवात केली. भांडणादरम्यान संतापलेल्या निजामने एका मोठ्या कातरीने आरिफवर हल्ला केला. हा हल्ला इतका जबरदस्त होता की ती कातरी थेट आरिफच्या छातीत घुसली आणि तो जागीच गतप्राण झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, निजामने हा अपघात असल्याचा बनाव केला. पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर एका तीन वर्षांच्या मुलाने निजामला आरिफवर हल्ला करताना पाहिल्याचं सांगितलं. मुलाच्या साक्षीवरून पोलिसांनी निजामची चौकशी केली, तेव्हा निजामने आपला गुन्हा कबूल केला. भाऊ आपल्याला सतत जाडा म्हणत असल्याच्या रागात त्याची हत्या केल्याचं निजामने पोलिसांसमोर सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी निजामविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.