
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
2019 ची लोकसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या दोन ते दिवसात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये हालचालींनी वेग घेतला आहे. तसेच विविध पक्षांमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचेही दिसून येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. आमदार जवाहर चावडा यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. शुक्रवारी जवाहर चावडा यांनी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांची भेट घेत आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. काँग्रेसला रामराम केल्यानंतर चावडा हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Gujarat: Congress MLA Jawahar Chavda tenders his resignation to Speaker Assembly Rajendra Trivedi pic.twitter.com/9IkjBDcRGJ
— ANI (@ANI) March 8, 2019
गेल्या काही दिवसांपासून गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढल्याचे दिसले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर 12 मार्चला गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीत असतानाच चावडा यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने पक्षामध्ये खळबळ उडाली आहे. तसेच काँग्रेस आमदार अल्पेश ठाकूर अर्धा डझन आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनाही ऊत आला आहे. याबाबत अल्पेश ठाकूर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत याबाबत ठाकूर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या चर्चांच्या पार्श्वभूमिवर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. गुरुवारी वडोदरामध्ये बोलताना अहमद पटेल म्हणाले की, ‘काँग्रेसचा एकही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत.’ परंतु शुक्रवारी दुपारीच काँग्रेसच्या आमदाराने राजीनामा दिल्याने नक्की काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.



























































