अनेक परीक्षा केंद्रावर राजरोसपणे कॉप्या सुरूच: कॉपी बहाद्दर काही केल्या पथकास सापडेनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
copy-exam
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । परभणी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, संभाजीनगरच्या वतीने जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. यापरीक्षेत कॉपी करता यावी, यासाठी शहराकडून खेड्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलून घेतले आहेत. अनेक परीक्षा केंद्रावर राजरोसपणे कॉपी प्रकार सुरु आहे. कॉपी बहाद्दरांवर कारवाईसाठी भरारी पथक तयार करण्यात आले असले तरी पाच पेक्षा अधिक कॉपी प्रकार पकडता आले नाही हे विशेष! काही केल्या भरारी पथकास कॉपी बहाद्दर सापडेनात. अशी स्थिती असताना दुसरीकडे या परीक्षेत कॉपीमुक्ती नावालाच उरली आहे.

बारावीची परीक्षा २१ फेबु्रवारी रोजी सुरु झाली असून पहिला पेपर इंग्रजीचा होता. अनेक परीक्षा केंद्रावर जत्रेचे स्वरुप आलेले दिसून आले. बारावीच्या ४२ परीक्षार्थींवर तर दहावीच्या पाच विद्यार्थी कॉपी करताना पथकास आढळले आहेत. दहावीच्या परीक्षा १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकीककडे कॉपीमुक्तीचा गाजावाजा केला जात असताना परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना राजरोपसणे कॉप्या पुरवल्या जात आहेत. या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. संभाजीनगर बोर्डाकडूनच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यात आले असल्याचे समोर आले आहे. कॉपीप्रकार होऊ नयेयासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्देश देत सीसीटिव्ही कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवण्याचे सांगीतले होते. अनेक परीक्षा केंद्रावर सीसी कॅमेरेच नाहीत, असे चित्र पहावयास मिळाले. तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडू नये यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या वतीने दर पेपरला परभणी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर शांतातेत आणि सुरळीत परीक्षा पार पडत असल्याचा दावा करत कोठेही गैरप्रकार आढळून आला नाही, असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतांश परीक्षा केंद्रावर राजरोसपणे कॉपी प्रकार चालूच असून नियंत्रणात आणण्यासाठी बैठे पथक आणि भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु भरारी पथकास कॉपी बहाद्दर विद्यार्थी आढळत नसल्याचे दिसून येत आहे. बैठे व भरारी पथक नावालाच उरले असून विशिष्ट परीक्षा केंद्रावरच सामुदायिक कॉपीचे प्रकार देखील होत असल्याचे चित्र आहे.