
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राजधानी नवी दिल्लीत सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने रविवारी निवडणुकीची अधिकृत घोषणा केली आहे. दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. तर देशभरात 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांनी आपण निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगितले.
राजधानी दिल्लीतील चांदनी चौक, पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, उत्तर पूर्व दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली या सात जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपने सातही जागांवर विजय मिळवला होता. दिल्ली विधानसभेत बहुमत मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला लोकसभेची एकही जागा मिळवता आली नव्हती. तर 2009 मध्ये काँग्रेसने दिल्लीतील सातही जागावंर विजय मिळवला होता. दिल्लीतील सातही जागांवर एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यामुळे यावेळी जनता काय कल देणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
























































