
सामना ऑनलाईन। पुलवामा
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहिम हाती घेतली आहे. याचदरम्यान, पुलवामा येथे रविवारी सुरक्षा दल व दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यावेळी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा जिल्हा प्रमुख कमांडर मुद्दसिर खान याच्यासह अन्य तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला.
यातील कमांडर मुद्दसिर हा पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचे समोर आले . आदिल अहमद दार व मुद्दसिर खान यांनीच पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट आखला होता. व्यवसायाने इलेक्ट्रीशियन असलेल्या मुद्दसिरने 2017 साली जैश ए मोहम्मद मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून तो आदिल दारच्या संपर्कात होता. सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी सज्जादच्या गाडीचा वापर करण्याचा सल्लाही मुद्दसिरने आदिल अहमद दारला दिला होता.
पण हल्लाच्या घटनेनंतर तो गायब झाला होता. मात्र काही दिवसांपू्र्वी तो त्राल भागातील पिंगलिश भागात आल्याचे सुरक्षा दलाला कळाले. त्यानंतर जवानांनी या भागात शोध मोहिम सुरू केली. जवान आल्याचे कळताच येथील घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. जवांनाही त्यास चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी जवानांनी केलेल्या गोळीबारात मुद्दसिर व अन्य तीव दहशतवादी ठार झाले.

























































