विविध योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही; जिल्हा बँकेत प्रचंड गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथरी

दुष्काळी अनुदान, पीकविमा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार होते. मात्र, हे पैसे अद्यापही जमा झाले की नाही, याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही ठोस माहिती मिळत नाही. तसेच बँकेमध्ये पासबुकावर नोंद मिळणेही कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांना मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मॅसेज आल्याने त्यांनी याबाबत विचारणा करण्यासाठी बँकेत धाव घेतली. प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे उघड झाले आहे. ऑनलाईनच्या घोळामुळे शेतकऱ्यांना अद्याप दमडीही मिळालेली नाही. मात्र, आलेल्या मॅसेजमुळे जिल्हा बँकेसह इतर बँकांमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

पाथरी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत शेतकऱ्यांनी आपापले खाते तपासण्यासाठी व पैसे काढण्यासाठी म्हणून सोमवारी प्रचंड गर्दी केली होती. परंतु आपल्या बँक खात्यावर नेमक्या कोणत्या योजनेच्या अनुदानाची रक्कम जमा झाली याचा घोळ काही मिटत नव्हता. पंतप्रधान किसान सन्मान योजना, पीकविमा की दुष्काळी अनुदान यापैकी नेमकी कोणती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली याची नोंद पासबुकावर घेण्यासाठी व पैसे उचलण्यासाठी सोमवारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत गर्दी केली होती. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच जमा झाले नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.