विजेचा धक्का लागून मुलगा जखमी; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घडली घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जसखार गावातील एका 12 वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का लागून तो जबर जखमी झाला आहे. यश शेळके असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. खेळत असताना लोंबकळणाऱ्या वीजेच्या तारेचा शॉक त्याला लागला. त्याच्यावर पनवेल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत. या अपघाताला कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे.

जसखार गावाजवळ चौथ्या बंदरासाठी करळ पुलाला जोडणारा रस्ता बनविण्याचे काम सूरू आहे. यासाठी माती दगडाचा भराव टाकण्यात येत आहे. या रस्त्यासाठी ठेकेदाराने उच्च दाब वाहिनीजवळ मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे वीज वाहिनी भरावापासून चार फुटापर्यंत खाली आली आहे. या वीजवाहिनीजवळ मातीवर खेळत असताना या मुलाला वीज वाहिनीचा स्पर्श होऊन जोरदार धक्का बसला आणि तो जबर जखमी झाला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या मुलाला विजेचा शॉक लागला असल्याचे या मुलाच्या पालकांचे म्हणणे आहे. अगोदरच या रस्त्याला जसखार ग्रामस्थांचा विरोध असताना बळजबरीने रत्नेश्वरी मंदिराच्या बाजूने हा रस्ता बनविला आहे. त्यात हा अपघात झाल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या बाबतचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ मंगळवारी कामाच्या ठिकाणी धडक देणार आहेत. याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्याकडे विचारणा केली असता या बाबत चौकशी सूरू असल्याचे त्यांनी सांगितले.