
सामना प्रतिनिधी । वाढवणा
वाढवणा पासून जवळच असलेल्या वाढवणा पाटी व परिसरात सोमवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान नांदेड बिदर राज्य मार्गावर असलेल्या वाढवणा पाटी येथील कुबेर पेट्रोल पंपाशेजारी एक बिबटा रस्ता ओलांडताना नांदेड उदगीर या एसटीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिसला.
उदगीर-नांदेड ही बस सोमवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान वाढवणा पाटीवरून नांदेडकडे जात असताना नांदेड बिदर या राज्य मार्गावर असलेल्या वाढवणा पाटी जवळील कुबेर पेट्रोल पंपाजवळ अचानक एस.टी. चालकाला समोरून रस्ता ओलांडणारा एक बिबट्या दिसला. बिबट्या गाडीसमोर आल्याने अचानक ब्रेक दाबल्याचे बस चालकाने प्रवाशांना सांगितले आणि साऱ्यांनी चालकाजवळ गर्दी केली. प्रत्येक जण ही खबर फोनवरून माहिती कळवू लागला. काही मिनिटात बिबट्या तिथून पळाला. बिबट्या दिसल्याच्या चर्चेमुळे मोटार सायकल, जीप चालक भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत होते.
दरम्यान, वन विभागाचे कर्मचारी एन. ए. डिगोळे वनरक्षक उदगीर व त्यांचे सहकारी सूर्यवंशी, गायकवाड, बिरादार, शेवाळे यांनी या भागाची पाहणी केली. तसेच बिबट्या दिसल्यास त्याची तात्काळ माहिती पोहोचवण्यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.
































































