सामना प्रतिनिधी । कल्याण
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवत असून सर्वच उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 14 गणांमध्ये शिवसेनेने प्रचाराच्या झंझावती तीन फेऱया पूर्ण केल्या आहेत. शिवसेनेचा एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आला आहे. 16 जागांसाठी 17 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
नवीन शासन नियमानुसार शेतकरी असणारी व्यक्तीच बाजार समितीचा सभासद असणार आहे. 18 हजार सातशे सभासद मतदानासाठी पात्र आहेत. 18 पैकी शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध आहे. आता 16 जागांसाठी 52 उमेदवार रिंगणात आहेत. मांडा, बल्याणी, बाराके, कल्याण, निळजे, नांदिवली तर्फे पाचनंद, फळेगाव, कुंदे, गोकेली खुल्या प्रवर्गासाठी; खडवली, टिटवाळा हे दोन गट महिलांसाठी; बाकेघर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी; आयरे विमुक्त जमातीसाठी तर रायते इतर मागासवर्गासाठी राखीव आहे.
18 मार्चला मतमोजणी
दोन जागा व्यापारी अडतवर्गासाठी आणि एक जागा हमाल माथाडीवर्गासाठी राखीव आहे. दरम्यान, आयरे गणातील भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातील शिवसेनेचे मंगल म्हस्के बिनविरोध विजयी झाले आहेत. सर्वच गटात शिवसेनेच्या उमेदवारांना शेतकरी, व्यापारीवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 17 मार्च रोजी निवडणूक होत असून 18 मार्च रोजी मतमोजणी आहे.
































































