
सामना प्रतिनिधी । नगर
सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नगरच्या राजकीय घडामोडीना वेग आला आहे. त्यानंतर विखेंची यंत्रणा अधिक जोमाने सक्रिय झाली असून प्रत्येक तालुक्यात नियोजन आखून यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीत आघाडीला उमेदवार निश्चित न झाल्याने अजुनही कार्यकर्ते संभ्रावस्थेत आहेत.
सुजय विखे यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर नगरच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 1991 मध्ये यशवंतराव गडाव विरुध्द बाळासाहेब विखे अशी लढत सुध्दा चांगलीच गाजली होती. त्याच लढतीची आठवण आज प्रत्येकाला होत आहे. गेल्या दोन वर्षापासून सुजय विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रचाराचा झंजावात त्या निमित्ताने सुरु केला होता. निवडणुकीला उभे राहणारच, पक्ष कोणताही असो अशी भुमिका त्यांनी घेतली होती. काँग्रेसला जागा न सोडल्यामुळे सुजय विखे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपमध्येसुध्दा काही प्रमाणात आनंद तर काही प्रमाणात नाराजी परसली आहे.
विखेंची यंत्रणा कार्यान्वीत झाली असून आता भाजपात प्रवेश केल्यामुळे मतदारापर्यंत पोहचण्यासाठी प्रचाराची यंत्रणा कशा पध्दतीने गतिमान करता येईल या दृष्टीकोणातून विखेंच्या विळदघाट येथील कार्यालयातून यंत्रणा सुरु झाली आहे. लोणीची यंत्रणासुध्दा यामध्ये कामाला लागली आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या व शिवसेनेच्या पदाधिकार्यांशी बोलणी व संपर्क विखे यंत्रणेने सुरु केला आहे.
काँग्रेस आघाडीत अद्याप उमेदवारीवरुन कोणताही निर्णय झालेला नाही, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी नगरची जागा जिंकायचीच व 1991 ची पुनरावृत्ती करायची, तसेच धनशक्तीचा पराभव करायचा असे निर्धार केला, मात्र या कार्यक्रमाला पदाधिकारी अनुपस्थित राहिले कारण आजच संध्याकाळी मुंबई येथे उमेदवार निश्चितिकरता पवारांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रशांत गडाख, अनुराधा नागवडे, प्रशांत गडाख यांची नांवे चर्चेत आहेत, त्यामुळे उमेदवारी ही कोणाला मिळणार हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे.
























































