
उदय जोशी । बीड
बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरविले. दुसऱ्या दिवशीपासूनच राष्ट्रवादीच्या बैठकांचा धडाका सुरू झाला. या बैठकांना राष्ट्रवादीचे बडे नेते जिल्हाभर फिरत असताना विधीमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर मात्र अजूनही अलिप्तच आहेत. बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला मत देण्याची जबाबदारी आता आपसुकच संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर पडली आहे. संदीप क्षीरसागर हे आव्हान पेलतात की नाही हे आगामी काळामध्ये स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेले पंडित कामाला लागले आहेत. दुसऱ्या दिवशीपासूनच राष्ट्रवादीचे बडे नेते धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर जिल्हाभरात बुथ प्रमुखांच्या बैठका घेत आहेत. बुथप्रमुखांच्या या बैठकीला विधीमंडळ उपनेते तथा बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर उपस्थित नव्हते. त्यांची भूमिका काय राहणार हे ही अद्याप गुलदस्त्यात आहे. क्षीरसागरांची भूमिका गुलदस्त्यात असताना तिकडे केजमध्येही नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा प्रचार यंत्रणेपासून सध्या तरी अलिप्त आहेत.
गटातटामध्ये विभागलेल्या राष्ट्रवादीचे डोकेदुखी वाढत आहे. बीड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी अंग काढून घेतले तर बीडमधून राष्ट्रवादीला मत देण्याची संपूर्ण जबाबदारी ही संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर येवून पडणार आहे. रविवारी सकाळी संदीप क्षीरसागरांनी आपल्या कार्यकत्र्यांची बैठक घेऊन गावागावात कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. चुलत्याच्या मदतीशिवाय संदीप क्षीरसागरांची ताकद या लोकसभेमध्ये स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बीड विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे.



























































