चिखलीच्या आदर्श विद्यालयातील 62 वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जागवल्या जुन्या आठवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

शालेय जीवनातील जुन्या आठवणींना 1956 पासून आजपर्यंत म्हणजे तब्बल 62 वर्षातील आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत उजाळा दिला. निमित्त होते आदर्श विद्यालयाच्या उद्या होत असलेल्या नुतन वास्तू उद्घाटनाचे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत 1956 मध्ये शिप्रमं तयार करुन आदर्श विद्यालयाची सुरुवात केली. जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे आज 74 वर्ग खोल्यांची नवीन भव्य वास्तू उभारण्यात आली. या वास्तूचे उद्या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. परंतु जुनी इमारत सोडून नवीन भव्य इमारतीत जात असताना या जुन्या शाळेच्या वर्ग खोल्या, मैदानातील आठवणी पुन्हा जागृत करुन शाळेचे नववास्तुचे वैभव माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर यावे म्हणून संस्थेने व आदर्श विद्यालयाने 1956 पासून आजपर्यंतच्या 62 वर्षातील हजारो माजी विद्यार्थ्यांना आज एकत्र आणले. आज सकाळी शिप्रमं महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बाळासाहेब दीक्षित यांचे हस्ते माजी विद्यार्थी मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे व सर्व संचालक मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात बाळासाहेब दीक्षित यांनी आदर्श विद्यालयाने गेल्या 62 वर्षात हजारो आदर्श व सुसंस्कृत विद्यार्थ्यांची पीढी निर्माण केल्याचे सांगून आज आदर्शचे विद्यार्थी देशात, विदेशात या शाळेचे व त्यांचे नाव उज्ज्वल करत आहे. असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. उद्घाटन कार्यक्रमानंतर वर्षनिहाय वेगवेगळ्या वर्गाचे विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण शाळेच्या वर्गात होऊन माजी शिक्षकांनी त्यांची आस्थेने एकमेकांची विचारपूस करत हितगुज साधले. त्यानंतर सायंकाळी समारोप कार्यक्रम पार पडला. अनेक वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा देत आपली जुनी वर्ग खोली, प्रयोगशाळा, मैदान पाहून त्यांना गहिवरुन आले. कलाशिक्षक सुधिर शेटे यांनी उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर जात आपल्या मित्र-मैत्रिणी व आपल्या वर्गाचे फोटो मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले. सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र असलेल्या माजी विद्यार्थ्यांना निरोप घेताना अनेकांच्या डोळ्यात आशृ्र तर अनेकांचे कंठ दाटून आले. शेवटी कवी प्रदीप यांच्या गिताप्रमाणे ‘तूट गई है माला, मोती बिखर गए, एक दीन रहकर साथ, जाने कीदर चले’ निरोप घेतला.