गावगोष्टी-सैलानी बाबा यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राजेश देशमाने

हजारो सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिह्यातील सैलानी बाबांची यात्रा दरवर्षी होळी ते गुढीपाडव्यादरम्यान भरत असते. सैलानी बाबांचे समाधीस्थळ मलकापूर-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर हातणीपासून पश्चिमेस 15 कि.मी. अंतरावर असून यात्रेसाठी मराठवाडा, खान्देश, कोकण, विदर्भ प्रांतासह नजीकच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांसह देशभरातून भाविक मोठय़ा प्रमाणात येथे येत असतात.

सैलानी बाबांचे मुख्य समाधीस्थळ असलेल्या दर्गा परिसरात अनेक ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने जांभुळीवाले बाबा, वाघजाळी, गवळीबाबा, ओलांडा, झीरा, महादेव मंदिर, मस्जीद, तलाव, लंगरखाना इत्यादी लहानमोठे अनेक ठिकाणे असून यात्रेकरूंचे आकर्षण बनले आहे. या ठिकाणी यात्रेला येणाऱयांमध्ये तांत्रिक-मांत्रिक, ‘अंगात संचार होणारे’, तसेच कथित भूतबाधा झालेल्या, इतर मनोविकारांनी त्रस्त महिला अशा अनेकांचा समावेश असतो. इथे पुरुषांमध्ये ‘वाघ’ संचारतो, त्याला ‘सैलानीचा वाघ’ म्हटले जाते. त्याचीसुद्धा 2-3 मंदिरे आहेत. हे ‘वाघ’ तेथे रुग्ण म्हणून आलेल्या महिलांना उपचाराच्या नावाखाली अनेक गोष्टी करायला भाग पाडतात. त्या पाहिल्या की आपल्याही अंगावर शहारे येतात. त्या महिलांच्या चेहऱयावरही प्रचंड भीती स्पष्टपणे दिसत असते. तरीही हे सगळे प्रकार दिवसभर लोकांसमोर आणि वाद्यांच्या गाजावाजात सुरू असतात. विशेष म्हणजे त्या महिलांचे पती, सासू-सासरे, नातेवाईक यांच्या डोळय़ादेखत हे सगळे सुरू असते.

येथून जवळच वाघजाळी आहे. ही वाघजाळी म्हणजे कोणत्या तरी झाडाच्या किंवा वेलीच्या लांबच लांब पसरलेल्या मुळांपासून बनलेली अर्धी जमिनीच्या वर, अर्धी जमिनीत रुतलेली भुयारासारखी जाळी. नागमोडी वळणाची ही वाघजाळी. या जाळीखालून सरपटत जाण्यासाठी अर्धा किलोमीटर लांब रांग. त्या जाळीच्या भोवताली झाडे. या झाडांवर हजारो लाखो जादूटोण्यासाठी वापरण्यात येणाऱया बाहुल्या-बिब्बे, खिळय़ांद्वारे टोचलेले. त्या बाहुली-बिब्यासोबत ज्याने कुणी आपल्यावर जादूटोणा, करणी केली अशी शंका आहे त्या व्यक्तीचा फोटो पण ठोकलेला दिसतो.

इथेच मोठी होळी असते. सुरुवातीला ही होळी पाच नारळांची असायची. आता इथे हजारो नारळ, जिवंत कोंबडय़ा, काळय़ा बाहुल्या, गंडे, धागे, दोरे टाकले जातात. ते जळून सर्व राख होते. दुसऱया दिवशी ही राख अंगाला लावण्यासाठी घेऊन जातात. पाच ट्रक नारळांची दुसऱया दिवशी झालेली मूठभर राखसुद्धा तिथे राहत नाही.

इथेच एक सैलानी बाबांची विहीर आहे. विहिरीचं पाणी पूर्ण आटलेलं. एक-दोन बारीक झरे सुरू असतात. त्या झऱयाचं थोडंसं पाणी जरी साचलं तरी ते पाणी लगेच बादलीने काढून बाटलीमध्ये तीर्थ म्हणून भरले जाते. ते पाणी 10 रुपये प्रतिबाटली विकले जाते. ‘आमच्याकडे ओरिजनल सैलानीच्या विहिरीचे पाणी मिळेल’ अशा आशयाचे बोर्ड लावलेली दुकानेदेखील येथे आहेत. जत्रेच्या मागच्या बाजूला एक पाण्याचे डबके आहे. या डबक्यात आंघोळ केल्याने सर्व प्रकारचे त्वचारोग बरे होतात, अशी आख्यायिका आहे. वास्तविक इतरांना आंघोळ करताना पाहूनसुद्धा किळस यावी इतके हे घाण डबके असते. तरीही लोक ते पाणी अंगाला लावत असतात.

या जत्रेत पोपटाद्वारे भविष्य सांगणारे ज्योतिषी, ग्रहतारे आणि राशींच्या खडय़ांची दुकाने, कोणता खडा सूट होईल हे तपासण्यासाठी वरवर चमत्कार भासणारे रासायनिक प्रयोग सर्वत्र दिसतात. यात्रेमध्ये फिरते सिनेमागृह, रहाटपाळणे, मौत का कुँवा, खानावळ, हॉटेल, विविध मनोरंजनाची साधने, खेळणी, कापड दुकाने यांच्यासह आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात तैनात असतो. अर्थात या वर्षी सैलानी यात्रा परिसरात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी सिनेमागृह, मौत का कुंवा, सर्कस, आकाशपाळणा याप्रकारच्या मनोरंजनविषयक बाबींवर जिल्हाधिकाऱयांनी बंदी घातली आहे.

सैलानी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली संदल मिरवणूक होळीच्या पाचव्या दिवशी पिंपळगाव सराई येथील संदल घरासमोरून सजविलेल्या उंटावरून काढण्यात येते. ही मिरवणूक सायंकाळी निघून मध्यरात्रीनंतर सैलानी दरबार येथे पोहचते. नंतर यात्रा परतीच्या मार्गावर लागते. पाच दशकांपूर्वी या ठिकाणी दूरवरचे भाविक आठ दिवस अगोदर मुक्कामी येत असत, साहजिकच होळीचा सण सैलानी येथे साजरा करीत असत. यावेळी जवळच्या जंगलातून लाकूडफाटा गोळा करून लाकडाची होळी पेटविली जात होती. कालांतराने होळीमध्ये आमूलाग्र बदल होऊन लाकडांऐवजी नारळ टाकून पेटविण्यात येणारी आगळीवेगळी नारळाची होळी उदयास आली. बिबा, गोटा, काळी बाहुली, लिंबू, खिळे इत्यादीचे संयुक्तिक नारळ नातेवाईक मंडळी विविध व्याधीग्रस्त रुग्णांच्या अंगाखांद्यावर ओवाळून होळीमध्ये जाळतात. यामुळे तो रुग्ण व्याधीमुक्त होतो अशी त्यांची भावना असते. दरवर्षी किमान पाच ट्रकपेक्षा जास्त नारळांची या होळीत ‘आहुती’ होते.

या यात्रेमध्ये मनोरुग्णासोबत उपचाराच्या नावाखाली अमानुष, अघोरी, विकृत उपचार उघडपणे करण्यात येतात. भूत उतरविण्याच्या नावाखाली रुग्णांना मारझोड करणे. केस पकडणे, डोळय़ात लिंबू पिळणे इत्यादी प्रकार केले जातात. हे सर्व सर्वांदेखत होते. हे सर्व टाळण्यासाठी कठोरपणे कारवाई करायला हवी.एकंदरीत सैलानी यात्रेत हौशे, नवशे, गवशे या प्रकारातील लोक पाहावयास मिळतात.

भूतबाधा की मानसिक आजार?

मानसिक आजार हे मेंदूमधील जैव रासायनिक जडणघडणीत असंतुलन झाल्यामुळे होतात. अशा रुग्णांना योग्य त्या उपचाराची, तज्ञ डॉक्टरांची गरज असते. मनोकायिक आजारांसोबतच मतिमंदत्व, चिंताजन्य विकृती, छिन्नमनस्कता, भ्रम, व्यसनाधीनता अशी अनेक कारणे असलेल्या रुग्णांना 17व्या शतकापर्यंत साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रघात होता. 19व्या शतकात फिलीप पिनेल व विल्यम यांनी कौटुंबिक वातावरणात मनोरुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली आणि अशा रुग्णांची साखळदंडातून सुटका झाली. डोरोथिया डिक्स या शिक्षिकेने मनोरुग्णांना दिल्या जाणाऱया अमानुष वागणुकीकडे जनतेचे आणि सरकारचे लक्ष वेधले. सिग्मन फ्राईड या शास्त्रज्ञाने मनोविकृती निर्माण होण्यामागे व्यक्तींच्या अंतर्मनात दाबून ठेवलेल्या प्रेरणा, इच्छा, आकांक्षा विशेषतः लैंगिक वासना कारणीभूत असतात असे मत मांडले आहे.