
>> मेधा पालकर
सगळीकडे जागतिक हवामान दिवस साजरा केला जात आहे. निसर्गाचा गैरवापर करून आपण जागतिक तापमानवाढीचे संकट ओढवून घेतले आहे. त्यासाठी जागतिक स्तरावर उपाय योजले जातील. मात्र एक नागरिक म्हणून मी काय करू शकतो याचा विचार करून कृती करण्याची वेळ आली आहे. तसा प्रयत्न प्रत्येकाने केला तर ही परिस्थिती नक्की आटोक्यात येऊ शकेल.
जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील ऋतुचक्र व हवामानात मोठे बदल झाले आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हळा या ऋतुचक्रात बदल झाला आहे. त्यामुळे जगभरातील दैनंदिन हवामानावर प्रभाव पडला आहे. तापमानवाढ ही ऋतुचक्र व हवामानावर परिणाम करते. त्यामुळे उष्णतेची लाट, पाऊस, ढगफुटी, वादळे, महापूर, थंडी आणि रोगराई अशा अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो.
पृथ्वीभोवती असणारा ओझोनचा थर कमी होत आहे. तर तापमानवाढीमुळे ध्रुव प्रदेशावरील बर्फ वितळत असून तेथील जैवविविधतेवर त्याचा परिणाम होत आहे.
निसर्गाचे एक चक्र आणि साखळी आहे. त्यातील एक साखळी तुटली तर दुसरी आणि पुढे ती तुटत जाते. आपण जंगले तोडली. त्यामुळे जैवविविधता कमी झाली. प्राणवायू कमी होऊन कार्बन वायू वाढला. कारखानदारी वाढविली. प्रदूषण वाढले. तापमान वाढले. नैसर्गिक संकटे वाढली यामधून पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वायू, जल, भूमी अशा जीवनावश्यक नैसर्गिक घटकांचे प्रदूषण करून आपले संकट ओढवून घेतले आहे. याची जाणीव आज नागरिकांना झाली आहे. जागतिक सरासरी तापमानवाढ होते त्याचा परिणाम पृथ्वीवर सर्वत्र जाणवतो. परंतु प्रादेशिक भौगोलिक कारणांमुळेसुद्धा तेथील तापमानात वाढ होते. खडकाळ आणि वाळूच्या भागात दिवसाचे तापमान जास्त असते. वायू प्रदूषण ज्या प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर उद्योग आहेत आणि प्रदूषण आहे तिथे तापमान जास्त असते. जसे विदर्भात नागपूर आणि चंद्रपूरसहित अनेक शहरांचे तापमान जास्त असते. शहरीकरण हेसुद्धा तापमानवाढीसाठी कारणीभूत आहे. शहरात काँक्रिटच्या लहान-मोठय़ा इमारती तापून रात्रभर उष्णता बाहेर सोडत असतात. यामुळे शहराचे दिवसा व रात्रीचे तापमान वाढते. हे तापमान ग्रामीण व जंगली भागापेक्षा 2 ते 3 डिग्री जास्त असते.
ही तापमानवाढ कमी करण्यासाठी जागतिक पातळी वर प्रयत्न सुरू झाले आहेत. ते प्रयत्न सुरू असताना एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण काय प्रयत्न करू शकतो हे पुण्यातल्या आयआयटीएम, पाषाण या संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद मुजुमदार यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, आपण दैनंदिन हवामान डोळसपणे पाहिले पाहिजे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तापमानाच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसात हवेतली आर्द्रता कमी झालेली असते. त्यामुळे उष्णता जाणवत राहते. या दिवसात उत्तरेकडून येणारे वारे शुष्क असतात. शिवाय सूर्याचे तापमान, यामुळे उष्णता जास्त जाणवते. अलीकडे आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे वादळं जास्त होताना दिसतात. त्यामुळे पूर्वमान्सून होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याला अनेक घटक कारणीभूत आहेत. वाढते नागरीकरण. त्यामुळे निसर्गाला अनावश्यक ओरबाडणे सुरू झाले. वृक्षतोड वाढली,. जंगल कमी होऊन इमारती वाढल्या. माणसाने नैसर्गिक स्रोतांचा एका मर्यादेपेक्षा जास्त वापर केला. त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे.
नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या समस्यांसाठी आपण निसर्गाला दोष द्यायला विसरत नाही. मात्र अनेक वेळा यातील काही समस्या या मानवनिर्मित समस्या असतात हे मात्र आपण सोयीस्कररीत्या विसरतो आणि याच समस्यांचे परिणाम निसर्ग काही वर्षांनी आपल्याला भोगायला लावत असतो. उदा. जागतिक तापमान वाढीमुळे अंटार्क्टिका येथील बर्फ दिवसेंदिवस वितळत आहे. तसेच 1950 पासूनच पृथ्वीचे तापमान वाढत गेले, मात्र आता आपल्याला अनियमित वातावरणातील बदल पाहायला मिळत आहे. ही समस्या मानवी जीवनाशी संबंधित असल्याने आपल्याला याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सगळीकडे जागतिक हवामान दिवस साजरा केला जात आहे. निसर्गाचा गैरवापर करून आपण जागतिक तापमानवाढीचे संकट ओढावून घेतले आहे. त्यासाठी जागतिक स्तरावर उपाय योजले जातील. मात्र एक नागरिक म्हणून मी काय करू शकतो याचा विचार करून कृती करण्याची वेळ आली आहे. तसा प्रयत्न प्रत्येकाने केला तर ही परिस्थिती नक्की आटोक्यात येऊ शकेल.
आता उन्हाळा सुरू झाला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करा असे सांगणारी वर्कशॉपसुद्धा एअर कंडिशनमध्ये होतात. असा विरोधाभास आपल्याकडे दिसतो. घरात किंवा कामाच्या ठिकाणी एअर कंडिशन लावून आपण बाहेरच्या वातावरणातले तापमान 2 डिग्रीने वाढवत असतो. खरं तर एसी 28 डिग्रीच्या खाली वापरू नये, पण ते 20 पर्यंत खाली नेऊन आपण आर्थरायटिससारख्या आजाराला निमंत्रण देत असतो. याबद्दल आपल्याकडे जनजागृती नाही. आपण एक्सहोस्ट पंखा लावून हवा खेळती ठेऊ शकतो.
माणसाचे शरीर हे 70टक्के पाण्याचे असते. पण या काळात म्हणावे इतके पाणी प्यायले जात नाही. त्यामुळे कफ, वात आणि पित्त याचा समतोल बिघडतो. प्रत्येक ऋतू बदला की त्या ऋतूत काय काळजी घ्यावी हे सांगणारे बुलेटिन हवे. तर समाजात जनजागृती होईल.
1. झाडांची संख्या कमी होणे.
2. दिवसेंदिवस सिमेंटच्या जंगलांमध्ये होणारी वाढ.
3. पृथ्वीच्या पोटातील पाण्याचा अमाप उपसा करणे.
4. कारखान्याचे विषारी वायू हवेत सोडणे.
5. दुचाकी आणि चारचाकीचा वाढता वापर.
6. हवामानात कार्बन, सल्फर आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढणे.
7. अल-निनो आणि ला-निनोचा वातावरणात वाढता प्रभाव
जागतिक हवामान संघटना (डब्ल्यू एम ओ) या संस्थेची स्थापना 23 मार्च 1950 रोजी जिनिव्हा येथे झाली. त्यानिमित्त हा दिवस दर वर्षी ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो. हवामानविषयक सर्व यंत्रसामग्री व तांत्रिक बाबींचे नियमन ही संघटना करते. आज या संस्थेचे भारतासहित सुमारे 191 देश सदस्य आहेत. या विशेष दिवसासाठी दरकर्षी एक थीम निवडली जाते. या वर्षीची थीम आहे, सूर्य, पृथ्वी आणि हवामान. हवामानामध्ये तीव्र बदल होत असून, दुष्काळ, गारपीट, अनियमित व अवेळी पाऊस, थंडी, उष्ण तापमान यांची तीव्रता वाढत आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने तापमानवाढ व बदलत्या हवामानाचा परिणाम याबाबत जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जागरुकताही निर्माण केली जाईल.

























































