
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शनिवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त रत्नागिरी शहर दुमदुमले. भगवे झेंडे आणि पारंपरिक वेशभूषेतील हजारो मराठा मंडळींनी यात सहभाग घेतला. ढोल-ताशा पथक, लेझीम पथक आणि घोडेस्वार महाराजांची पालखी आणि मूर्तीने या यात्रेची शोभा वाढवील. भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मराठा समाजातील हजारो बंधू-भगिनींनी सहभाग घेतला.
ढोल-ताशांचा गजर, छत्रपतींचा जयजयकार करत पारंपरिक वेशभूषेत ही शोभायात्रा काढण्यात आली. यात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. शनिवारी सायंकाळी मंडळाच्या सिद्धीविनायक रेसिडेन्सी येथील कार्यालयातून दुचाकी फेरी रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती मंदिरात नेण्यात आली. भगवती मंदिरामध्ये श्री भगवतीदेवीचे आशीर्वाद घेऊन शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर ती जयस्तंभ येथे आणण्यात आली आणि जयस्तंभ परिसरातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. जयस्तंभ येथे पालखीतील श्री शिवरायांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. भगवे फेटे, नऊवारी साड्या, पांढरा झब्बा-लेंगा अशा पारंपरिक वेशभूषेत मराठा समाजातील मंडळी उपस्थित होते. शोभायात्रेला सुरुवात झाली. लहान मुलेसुद्धा फेटा व पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली. शोभायात्रा नीटनेटकी, नेत्रदीपक आणि भव्यदिव्य स्वरूपात निघण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी नियोजन केले. या शोभायात्रेत क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांच्यासह मंडळाचे राजाराम साळवी, दिवाकर साळवी, सतीश साळवी, संतोष तावडे, संदीप मगदूम, उर्मिला घोसाळकर, प्राची शिंदे, शुभांगी इंदुलकर, कोमल तावडे, संध्या मोरे आदींसह सर्व पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
































































