
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जेट एअरवेजची 13 आंतरराष्ट्रीय उड्डाणे 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. भाडे न भरल्यामुळे जेटची 54 विमाने उभी असून दिल्ली आणि मुंबई विमानतळावरून होणारी 7 आंतरराष्ट्रीय उड्डाणे जेटने रद्द केली आहेत.
जेटच्या 7 आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या विमानांमध्ये 2 विमाने ही जेटलाईटची आहेत. भाडे कराराची रक्कम न भरल्याने ही उड्डाणे काही काळापुरती थांबविण्यात आली आहेत. गेल्या काही काळात जेटचा शेअर बाजारही गडगडला आहे. जेटचे शेअर दुसऱया क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. जेटचे पायलट आणि अन्य क्रू मेंबर्स अन्य विमान कंपन्यांशी संपर्क करीत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक हजार कोटी रुपये कर्मचाऱयांचे पगार आणि रद्द केलेल्या तिकिटांची भरपाई देण्यातच खर्च होणार आहेत.
ही उड्डाणे रद्द
पुणे-सिंगापूर (सात आठवडे), पुणे-अबुधाबी (आठवडय़ातील सात फ्लाईट्स), मुंबई-मँचेस्टर, दिल्ली-अबुधाबी (नऊ आठवडे), दम्मम (14 आठवडे), ढाका (11), हाँगकाँग, रियाद (7), मुंबई-अबुधाबी (12 आठवडे), बहरिन (4-7 आठवडे), दम्मम (14 आठवडे), मुंबई-हाँगकाँग, कोलकाता-ढाका.
जेटला दहा हजार कोटींची गरज
बँक जेटला एक हजार कोटी रुपयांची मदत करण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. जेटवर मात्र 25 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे व्यवसायात टिकून राहण्यासाठी जेटला कमीत कमी 10 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.























































